Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये रस्ते विकासाच्या अनेक प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच अजूनही अनेक रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे युद्ध पातळीवर सुरूच आहेत. अशातच आता महाराष्ट्रातील नागरिकांना एका नव्या एक्सप्रेस वे ची भेट मिळणार असल्याची बातमी समोर आली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जनतेसाठी हा नवा एक्सप्रेस वे अधिक महत्त्वाचा ठरणार आहे.
या नव्या महामार्गाच्या निर्मितीमुळे राज्यातील जवळपास 24 जिल्ह्यांमधील नागरिकांना प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरीत्या मोठा फायदा होणार आहे. खरे तर आम्ही ज्या महामार्गाबाबत बोलत आहोत तो महामार्ग आहे मुंबई ते नागपूर दरम्यानचा समृद्धी महामार्ग. याला बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग या नावाने ओळखले जाते. हा सध्याचा राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग प्रोजेक्ट म्हणूनही ओळखला जातो.

हा प्रकल्प राज्याचे मुख्यमंत्री श्रीमान देवेंद्र फडणवीस यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट असून याची पायाभरणी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली होती तसेच या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण सुद्धा स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केले. आत्तापर्यंत समृद्धी महामार्गाचे एकूण तीन टप्पे सुरू झाले असून या अंतर्गत महामार्गाचा 625 किलोमीटर लांबीचा भाग वाहतुकीसाठी उपलब्ध झालेला आहे.
सध्या नागरिकांना 701 किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाचा नागपूर ते इगतपुरी हा 625 किलोमीटरचा मार्ग उपलब्ध करून देण्यात आला असून या महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे म्हणजेच इगतपुरी ते आमने या शेवटच्या 76 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे उद्घाटन स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुढील महिन्यात होणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे.
कधी होणार उदघाट्न ?
खरे तर गेल्या काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे म्हणजेच इगतपुरी ते आमने या मार्गाचे लोकार्पण एक मे 2025 रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिन होऊ शकते असा दावा करण्यात आला होता. यानंतर प्रसारमाध्यमांमध्ये दोन मे 2025 ही नवीन तारीख समोर आली.
दोन मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या महामार्ग प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण करतील असा दावा काही प्रसारमाध्यमांमध्ये करण्यात आला. मात्र आता एका प्रतिष्ठित वृत्तसंस्थेने समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार मात्र तारीख अजून डिक्लेअर झालेली नसल्याची माहिती दिलेली आहे.
समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून याचे उद्घाटन पीएम मोदी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्याची दाट शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे याच्या उद्घाटनाची तारीख सुद्धा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
कसे आहेत समृद्धी महामार्गाचे पहिले 3 टप्पे
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच एमएसआरडीसी मुंबई ते नागपूर दरम्यानच्या समृद्धी महामार्गाचे काम करत आहे. दरम्यान, समृद्धी महामार्गाचा चौथा टप्पा येत्या काही दिवसांनी नागरिकांसाठी खुला केला जाणार आहे. याआधी समृद्धी महामार्गाचे तीन टप्पे नागरिकांसाठी सुरू झाले आहेत.
यातील पहिला टप्पा हा नागपूर ते शिर्डी 520 किलोमीटर लांबीचा होता आणि याचे लोकार्पण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 डिसेंबर 2022 रोजी केले होते. या महामार्गाचा दुसरा टप्पा म्हणजेच शिर्डीतील कोकमठाण ते नाशिक जिल्ह्यातील भरवीर 20 इंटरचेंज असा होता आणि याचे उद्घाटन 2023 मध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री श्रीमान एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.
या महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण तत्कालीन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले, या मार्गाचा तिसरा टप्पा भरवीर 20 इंटरचेंज ते इगतपुरी असा 25 किलोमीटर लांबीचा आहे. या महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण गेल्यावर्षी म्हणजेच मार्च 2024 मध्ये पूर्ण झाले. आता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इगतपुरी ते ठाणे जिल्ह्यातील आमने हा टप्पा पीएम मोदी यांच्या हस्ते लोकार्पित करून सर्वसामान्यांसाठी सुरू होऊ शकतो.