अहिल्यानगमध्ये होणारा सिमेंटचा प्रकल्प होऊ देणार नाही, नाहीतर रस्त्यावर उतरू; खासदार निलेश लंकेचा इशारा

निमगाव खलू येथील प्रस्तावित सिमेंट प्रकल्पास विरोध; शेती आणि आरोग्य धोक्यात येणार असल्याने खासदार नीलेश लंके यांनी प्रकल्प अन्यत्र हलवण्याची मागणी केली असून रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.

Published on -

Ahiklyanagar News: श्रीगोंदा- निमगाव खलू (ता. श्रीगोंदा) येथे दालमिया (भारत) ग्रीन व्हिजन लिमिटेड कंपनीने वार्षिक ६० लाख मेट्रिक टन सिमेंट निर्मितीचा प्रकल्प प्रस्तावित केला आहे. परंतु, या परिसरातील निमगाव खलूसह आसपासची गावे शेतीप्रधान आणि बागायती आहेत. हा प्रकल्प येथे न उभारता दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. या प्रकल्पामुळे शेती आणि लोकांचे आरोग्य धोक्यात येईल, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प येथे होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका खासदार नीलेश लंके यांनी व्यक्त केली. गरज पडल्यास या विरोधात रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी दिला.

शेतकऱ्यांवर परिणाम

निमगाव खलू येथे लंके यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला. भीमा नदीच्या पट्ट्यातील शेतकऱ्यांनी या प्रकल्पामुळे होणाऱ्या संभाव्य हानीकडे त्यांचे लक्ष वेधले. या भागातील अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. प्रकल्पामुळे शेती नष्ट होण्याचा धोका आहे, तसेच लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हा प्रकल्प अन्यत्र हलवावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

प्रकल्प रद्द करण्यासाठी पाठपुरावा

लंके यांनी याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. पुढील आठवड्यात दिल्लीत केंद्रीय उद्योगमंत्र्यांची भेट घेऊन हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिकांच्या सोबत राहून हा प्रकल्प रद्द करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या प्रसंगी जितेंद्र मगर, गणपत परकाळे, डॉ. संजय काळे, रमेश परकाळे, योगेश मगर, योगेश भोईटे, अनिल मगर, नितीन थोरात, अविनाश जठार, बाळासाहेब पवार, डॉ. सचिन मगर, राकेश पाचपुते, बंडू जगताप, योगेश कोळसे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

९८० कोंटीची गुंतवणूक

प्रस्तावित प्रकल्प निमगाव खलू शिवारातील ३३.८६ हेक्टर जमिनीवर ९८० कोटी रुपये गुंतवणुकीसह उभारण्यात येणार आहे. यातून दररोज १६,४३८ मेट्रिक टन सिमेंट निर्मिती होईल.

या गावांना बसणार फटका

या प्रकल्पामुळे निमगाव सांगवी दुमाला, गार, कौठा, आनंदवाडी, अजनूज, आर्वी, अनगरे (सर्व ता. श्रीगोंदा) आणि सोनवडी तसेच दौंड नगरपरिषद (ता. दौंड, जि. पुणे) ही गावे प्रभावित होणार आहेत. प्रकल्पासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पर्यावरण परवानगीसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात मंडळाने लोकसुनावणी आयोजित केली असून, ती मंगळवारी (दि. २९) सकाळी ११ वाजता सांगवी फाटा येथील शांताई मंगल कार्यालयात होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News