Ahilyanagar News: अहिल्यानगर- नवीन शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ साठी शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे. येत्या दीड महिन्यांत शाळा सुरू होणार असून, पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील सुमारे ४.६ लाख विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमधील अंदाजे दोन लाख विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्याचे नियोजन आहे. यासाठी विद्यार्थ्यांची मापे घेण्याचे काम शाळा व्यवस्थापन समित्यांमार्फत अंतिम टप्प्यात आहे.
दरवर्षी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. यंदा जिल्ह्यातील या वर्गांसाठी २३.८५ लाख पुस्तकांची मागणी बालभारतीकडे नोंदवण्यात आली आहे. शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापासून ही पुस्तके शाळांमध्ये पोहोचण्यास सुरुवात होईल. यामुळे शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळतील, असा विश्वास विभागाने व्यक्त केला आहे.
शाळेच्या पहिल्याच दिवशी वाटप
यंदा गणवेश वाटपाची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समित्यांकडे सोपवण्यात आली आहे. शासनाने याबाबत स्पष्ट सूचना दिल्या असून, बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांची मापे घेण्याचे काम पूर्ण झाले आहे. १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तके देण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी स्थानिक पातळीवर आवश्यक सूचना दिल्या असून, त्यानुसार तयारी केली जात आहे.

मापे घेण्याचे काम सुरू
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दरवर्षी एक जोडी बूट आणि दोन जोड्या पायमोजे दिले जातात. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यामागे १७० रुपये खर्च येतो. मात्र, यंदा बूट खरेदीसाठी अद्याप निधी प्राप्त झालेला नाही. त्यामुळे शाळांमध्ये बुटांची मापे घेण्याचे काम सुरू झालेले नाही, अशी माहिती समोर आली आहे.
नव्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत
नवीन शैक्षणिक वर्षात शाळेत दाखल होणाऱ्या नव्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्याची तयारी आहे. पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके आणि गणवेश वाटपासाठी सर्व तालुका पातळीवर सूचना देण्यात आल्या आहेत. काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास त्या प्रशासकीय स्तरावर सोडवण्याचा प्रयत्न करू, असे जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी सांगितले.