Ahilyanagar Politics: अहिल्यानगर- भाजपच्या संघटन पर्वात मंडलाध्यक्ष निवडीसाठी जी पद्धत वापरली गेली, तीच आता जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीसाठी वापरली जात आहे. पक्षाच्या प्रभारी आणि निरीक्षकांनी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून तीन जिल्हाध्यक्षपदांसाठी पसंतीची नावे बंद पाकिटात घेतली आहेत. ही बंद पाकिटे आता प्रदेश कार्यालयाकडे पाठवली जाणार आहेत.
त्यामुळे जिल्हाध्यक्ष निवडीचा अंतिम निर्णय प्रदेश पातळीवर होणार आहे. येत्या ५ मे पर्यंत नव्या जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पक्षाने जिल्हाध्यक्षपदासाठी ४५ ते ६० वयाची मर्यादा आणि किमान दोन पंचवार्षिक सक्रिय सभासदत्वाचा निकष ठेवला आहे. यामुळे अनेक इच्छुकांचे स्वप्न भंगले आहे.

प्रभारी म्हणून जयकुमार रावल यांची नियुक्ती
भाजपमध्ये सध्या संघटनात्मक कामांना वेग आला आहे. सदस्यत्व नोंदणी, बूथ समित्या आणि मंडलाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता सर्वांचे लक्ष जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीकडे लागले आहे. रविवारी शिर्डीत पक्षाचे प्रभारी जयकुमार रावल, महानगर जिल्हाध्यक्षपदाचे निरीक्षक ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, दक्षिणचे निरीक्षक माजी आमदार बाळासाहेब सानप आणि उत्तरेचे निरीक्षक आमदार विक्रम पाचपुते यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
या बैठकीत तिन्ही जिल्हाध्यक्षांच्या कार्यक्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी, आमदार, खासदार आणि विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्याकडून प्रत्येकी तीन पसंतीची नावे बंद पाकिटात घेण्यात आली. ही नावे आता प्रदेशकडे पाठवली जाणार असून, ज्या नावाला सर्वाधिक पसंती मिळेल, त्या व्यक्तीची जिल्हाध्यक्षपदी निवड होईल.
आमदारासंह आजी-माजी जिल्हाध्यक्षांनी दिली पसंतीची नावे
दक्षिण जिल्ह्यासाठी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, आमदार शिवाजी कर्डिले, आमदार मोनिका राजळे, आमदार विक्रम पाचपुते यांच्यासह माजी-आजी जिल्हाध्यक्ष आणि सरचिटणीस यांनी आपली पसंतीची नावे दिली. महानगरासाठी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी, तर उत्तरेसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि डॉ. सुजय विखे यांच्या जवळच्या पदाधिकाऱ्यांनी नावे सुचवली. महानगर जिल्हाध्यक्षपदासाठी सचिन पारखी, बाबासाहेब वाकळे, बाबासाहेब सानप यांची नावे चर्चेत आहेत. दक्षिण जिल्हाध्यक्षपदासाठी दिलीप भालसिंग, युवराज पोटे, अशोक खेडकर, रवी सुरवसे, बाळासाहेब महाडीक, सचिन पोटरे यांची नावे पुढे आहेत. तर उत्तर जिल्हाध्यक्षपदासाठी जालिंदर वाकचौरे, शिवाजी गोंदकर, नितीन कापसे यांची नावे चर्चेत आहेत.
जिल्हाध्यक्ष पदासाठी निकष
पक्षाने जिल्हाध्यक्ष निवडीसाठी काही कडक निकष लावले आहेत. इच्छुकाचे वय ४५ ते ६० वर्षांच्या दरम्यान असावे आणि त्याने किमान दोन पंचवार्षिक पक्षाचा सक्रिय सभासद असावे. तसेच, पक्षात नव्याने आलेल्यांना थेट ही संधी दिली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले. या निकषांमुळे अनेक इच्छुकांना अडचणींचा सामना करावा लागला आहे आणि काहींची संधी हुकली आहे.
जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीत प्रा. राम शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या समर्थकांमध्ये चुरस दिसत आहे. विशेषतः नगर शहर आणि दक्षिण जिल्हाध्यक्षपदासाठी ही रस्सीखेच तीव्र आहे. उत्तर जिल्हाध्यक्षपदाबाबत मात्र विखे यांचा शब्द अंतिम मानला जाईल, त्यामुळे तिथे फारशी स्पर्धा नाही. पण, नगर शहर आणि दक्षिणेत कोण बाजी मारणार, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.