अहिल्यानगर : पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथे मुख्यालय असलेल्या राजे शिवाजी पतसंस्थेच्या गैरव्यवहारातील मुख्य सुत्रधार, संस्थेचा चेअरमन, जिल्हा परिषदेचा माजी सदस्य आझाद प्रभाकर ठुबे याच्यासह, गोरेश्वर पतसंस्थेचा चेअरमन बाजीराव पानमंद,
राजे शिवाजी पतसंस्थेच्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी पोपट ढवळे तसेच कान्हुर पठारच्या जनता विद्यालयाचा उपशिक्षक साहेबराव जऱ्हड यांच्यासह न्यायालयीन कोठडीतील २१ आरोपींना नाशिकच्या कारागृहात हालविण्यात आले आहे.

यासंदर्भात मिळालेल्या माहीतीनुसार आझाद ठुबे याने कोठडीमध्ये पुरेसे पाणी मिळत नसल्याची तक्रार जेलरकडे केली होती. ही बाब जेलरने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायालयाने पारनेर पोलीस प्रशासनाकडे त्यासंदर्भात विचारणा केली होती.
न्यायालयाच्या विचारणेनंतर पारनेर पोलीसांनी न्यायालयास सुमारे २०० ते २५० पानांचा अहवाल सादर केला. सध्या उन्हाळयामुळे पारनेर शहरात पाण्याची तिव्र टंचाई आहे. शहराच्या काही भागांना १२ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
अश्या बिकट परिस्थितीतही पोलीस प्रशासन आरोपींना पुरेसे पाणी उपलब्ध करून देते. मात्र आरोपींच्या मागणीनुसार पाणी देण्यास असमर्थ असल्याने या आरोपींना नाशिक येथील कारागृहात हालविण्याचा अभिप्राय देण्यात आला होता. त्यानुसार या आरोपींना नाशिक येथे हालवण्यात आले आहे.













