Indurikar Maharaj : आजचा तरुण गैरमार्गाने संपत्ती कमावतो आणि व्यसनांच्या आहारी जाऊन आपल्या देहाचे वाटोळे करून घेतो. त्याचबरोबर आपल्या संसाराची धुळधाण करून घेत आहे. परमेश्वराने माणसाला दिलेला मानवी देह मौल्यवान असून, त्याची काळजी घ्यावी, असे आवाहन समाजप्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी केले.
वै. हभप गुरुवर्य बबन महाराज पायमोडे यांच्या आशीर्वादाने व गुरुवर्य हभप विकासानंद महाराज मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली टाकळी ढोकेश्वर येथे सुरू असलेल्या येथील अखंड हरिनाम सप्ताहातील कीर्तनात कौटुंबिक व्यवस्थेवर मार्गदर्शन करताना इंदोरीकर महाराज बोलत होते.

पुढे मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, आज व्यसनाधिनतेमुळे मुलांना पोरके व्हावे लागत आहे. दारूमुळे संसार उद्ध्वस्त होत आहेत. दारूच्या आहारी गेलेल्या कर्त्यापुरुषाच्या कुटुंबातील दाहकता खूप मोठी आहे. दारू पिणाऱ्यांनी, पाजणाऱ्यांनी व सवय लावणाऱ्यांनी भानावर यावे. पालकांनी मुलांची काळजी घेतली पाहिजे. आज १६ – १७ वर्षांची मुले गुन्हेगार बनत आहेत.
मुली लायकी नसलेल्या मुलांच्या प्रेमात पडून जीवन उद्ध्वस्त करत आहेत. आजच्या कुटुंबव्यवस्थेवर बोलताना आज आजोबा-आजी आपल्या नातवाला मांडीवर घेऊन खेळवू शकत नाही, हे दुर्दैव असल्याचे सांगितले.
टाकळी ढोकेश्वर गावच्या अखंड हरिनाम सप्ताहाचे त्यांनी कौतुक करत गावच्या सप्ताह नियोजनाचा आदर्श इतरांनी घ्यावा, असे आवाहनही केले. सप्ताह कमिटीच्या वतीने निवृत्ती महाराज देशमुख यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी टाकळी ढोकेश्वर ग्रामपंचायतीचे सरपंच व सर्व सदस्य, भजनी मंडळ व ग्रामस्थ तसेच दत्त सप्ताह कमिटी प्रयत्न शील आहे.