8th Pay Commission : सध्या संपूर्ण देशभर आठव्या वेतन आयोगाच्या चर्चा सुरू आहेत. खरंतर जानेवारी महिन्यात केंद्रातील मोदी सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आणि सहकारी कर्मचाऱ्यांचे गेल्या अनेक महिन्यांपासून ची मागणी मान्य केली. वेतन आयोगाबाबत बोलायचं झालं तर प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होत असतो.
सध्याचा सातवा वेतन आयोग हा 2016 मध्ये लागू झाला आणि तो 2025 च्या शेवटी संपणार आहे. 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू असून 31 डिसेंबर 2025 रोजी सध्याचा सातवा वेतन आयोग समाप्त होईल आणि त्यानंतर एक जानेवारी 2026 पासून नवीन आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे.

दरम्यान या नव्या वेतन आयोगाचा लाभ केंद्रातील लाखो कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना मिळणार असल्याचा दावा केला जातो. केंद्रातील जवळपास 15 लाख सरकारी कर्मचारी आणि 65 लाख पेन्शन धारकांना नव्या आठव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे.
यामुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे आणि पेन्शनधारकांची पेन्शन सुद्धा वाढणार आहे. यामुळे सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आणि पेन्शनधारकांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण आहे. मात्र अशी सारी परिस्थिती असतानाच अलीकडेच असे वृत्त आले आहे की, जानेवारी 2026 पूर्वी निवृत्त होणाऱ्यांना नव्या आठव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार नाही.
यामुळे सध्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पाहायला मिळत आहे. दरम्यान आता याबाबत केंद्र सरकारचा नेमका काय प्लॅन आहे? कोणत्या रिटायर्ड कर्मचाऱ्यांना चा लाभ मिळणार नाही? केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन याबाबत काय म्हणतात याचाच आज आपण आढावा घेणार आहोत.
अर्थमंत्र्यांनी काय सांगितलं?
मीडिया रिपोर्टनुसार, केंद्रातील सरकार पेन्शन धारकांना दोन गटात विभाजित करू शकते. पहिला गट एक जानेवारी 2026 पूर्वी रिटायर होणाऱ्या पेन्शन धारकांचा राहणार आहे आणि दुसरा गट 1 जानेवारी 2026 नंतर रिटायर्ड होणाऱ्या पेन्शन धारकांचा राहील.
यामुळे एक जानेवारी 2026 पूर्वी जे रिटायर होतील त्यांना कदाचित आठव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार नसल्याच्या चर्चा सुरू होत्या. दरम्यान आता याच संदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी माहिती दिली आहे.
निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत याबाबत बोलताना अशी माहिती दिली की, वित्त विधेयकात केलेले बदल केवळ जुन्या नियमांच्या वैधतेसाठी आहेत. यामुळे पेन्शन लाभ कमी होणार नाहीत. त्यांनी असेही सांगितले की 7 व्या वेतन आयोगात सर्व पेन्शनधारकांना निवृत्तीच्या तारखेची पर्वा न करता समान लाभ मिळाले आहेत.
सहाव्या वेतन आयोगात केंद्रातील सरकारकडून पेन्शन देताना भेदभाव करण्यात आला होता मात्र सातव्या वेतन आयोगात तसे काही झाले नाही. आणि आता आठव्या वेतन आयोगात देखील तसे होणार नाही. म्हणजेच 1 जानेवारी 2026 पूर्वी निवृत्त होणाऱ्यांना आठवा वेतन आयोगाचा लाभ मिळणार नाही या ज्या चर्चा सुरू आहेत त्या निरर्थक असल्याचे निर्मला सीतारामन यांच्या या विधानावरून स्पष्ट होते.
आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार?
आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार फिटमेंट फॅक्टर वर अवलंबून राहणार आहे. सध्या ज्या चर्चा सुरू आहे त्यानुसार आठव्या वेतन आयोगात केंद्रातील सरकार सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 2.00, 2.08 किंवा मग 2.86 इतका फिटमेंट फॅक्टर लागू करू शकते.
आता जर समजा फिटमेंट फॅक्टर 2.00 इतका मंजूर झाला तर किमान वेतन दुप्पट होणार आहे म्हणजेच किमान वेतन 18000 वरून 36 हजारावर जाणार आहे. तसेच पेन्शन 9000 वरून 18 हजार रुपये इतकी होणार आहे.
जर समजा फिटमेंट फॅक्टर 2.08 इतका मंजूर करण्यात आला तर किमान वेतन 18 हजार रुपयांवरून 37 हजार 440 रुपये एवढे होणार आहे. तसेच फिटमेंट फॅक्टर 2.86 इतका मंजूर करण्यात आला तर किमान वेतन 18 हजार रुपयांवरून 51 हजार 480 रुपये एवढे होणार आहे.