Thane News : ठाणे महापालिकेने नव्याने केलेल्या सर्वेक्षणात धोकादायक इमारतीच्या संख्येत ८८ ने वाढ झाली आहे. तर अतिधोकादायक इमारतींच्या संख्येत घट होऊन तो आकडा ९६ वरुन ८७ वर आला आहे. यापूर्वी ठाणे महापालिका क्षेत्रात ४ हजार ४०७ धोकादायक इमारती होत्या. त्यात आता वाढ झाल्याने ही संख्या ४ हजार ४९५ इतकी झाली आहे.
ठाणे महापालिके च्या अतिक्रमण विभागामार्फत धोकादायक, अतिधोकादायक इमारतीचे नव्याने सर्वेक्षण करण्यात आले होते. महापालिका परीक्षणासाठी महापालिकेवर ९० हून अधिक जणांचे पॅनल आहे, त्यांच्याकडून धोकादायक इमारतींचा सव्र्व्हे केला गेला आहे. त्यानुसार आता अंतिम यादी पुढे आली आहे.

यापूर्वी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात अतिधोकादायक इमारतींची संख्या ही ९६ होती. ती आता ८७ वर आली आहे. दुसरीकडे सी २ ए इमारतींची संख्या या पूर्वी २०६ होती, ती संख्या कमी होऊन २०० वर आली आहे. तर सी २ बी इमारतींची संख्या ही २ हजार ४८६ एवढी होती.
ती संख्या आता २ हजार ५३२ एवढी झाली आहे. यात ४६ इमारतींची भर पडली आहे. तर सी ३ मधील संख्या ही यापूर्वी १ हजार ६१९ होती. तरी आता १ हजार ६७६ एवढी झाली आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील अतिधोकादायक तसेच धोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात येते.
मागील दोनच महिन्यांपूर्वी सेम अश्या प्रकारच एक यादी ठाणे महापालिका प्रशासनाने जाहीर केली होती. यामध्ये संपूर्ण शहरात ४ हजार २९७ इमारती धोकादायक होत्या. तर अतिधोकादायक हे इमारतींची संख्या ८६ होती. त्या इमारतींपैकी २५ इमारती महापालिकेने यापुर्वीच रिकाम्या केल्या आहेत.
त्यानंतर पुन्हा करण्यात आलेल्या सर्वेक्षणात यामध्ये वाढ होऊन हा आकडा ४ हजार ४०७ वर गेला होता. तर अतिधोकादायक इमारतीची संख्या ९६ होती. परंतु आता परत एकदा महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून करण्यात आलेल्या सव्र्व्हेत हा आकडा ४ हजार ४९५ एवढा झाला आहे. तर अतिधोकादायक इमारतींच्या संख्येत घट होऊन तो आकडा ९६ वरुन ८७ वर आला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींचे सी- १, सी-२ ए, सी-२ बी आणि सी- ३ अशा चार टप्प्यांत वर्गीकरण केले आहे. यात सी-१ म्हणजे राहण्यास अयोग्य आणि तात्काळ निष्कासित करावी लागणारी अतिधोकादायक इमारत, सी-२ ए म्हणजे इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरुस्ती करणे, सी-२ बी म्हणजे इमारत रिकामी न करता त्याची संरचनात्मक दुरुस्ती करणे आणि सी-३ म्हणजे इमारतींची किरकोळ दुरूस्ती करणे अशाप्रकारे समावेश आहे.