Ahilyanagar News: अहिल्यानगर- महापालिकेने मालमत्ताधारकांसाठी ऑनलाइन कर भरण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेला नागरिकांनी चांगलाच प्रतिसाद दिला असून, गेल्या वर्षभरात तब्बल १७ हजार मालमत्ताधारकांनी ऑनलाइन पद्धतीने कर भरला आहे. ही सुविधा वापरायला सोपी असून, यामुळे नागरिकांचा वेळ आणि मेहनत दोन्ही वाचत आहेत. घरबसल्या कर भरण्याची ही सोय नागरिकांसाठी मोठी जमेची बाजू ठरली आहे.
नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यापासून महापालिकेने पाणीपट्टीच्या नवीन दरांसह बिलांचे वाटप सुरू केले आहे. यंदा बिलांचे वाटप काहीसे उशिरा सुरू झाले असले, तरी सर्वसाधारण करावर १० टक्के सवलत देण्यात आली आहे. ही सवलत एप्रिल महिन्यासाठी जाहीर करण्यात आली होती, पण बिल वाटपाला उशीर झाल्याने सवलतीची मुदत वाढवण्यात आली.

३१ मेपर्यंत १० टक्के सवलत
आता १ मे ते ३१ मे या कालावधीतही ही १० टक्के सवलत मिळणार आहे. गेल्या वर्षी अनेकांनी वेळेत कर न भरल्याने दंड भरावा लागला होता. पण आता ऑनलाइन सुविधेमुळे महापालिका कार्यालयात जाण्याची गरज नाही. घरी आलेल्या बिलावरचा क्यूआर कोड स्कॅन करून बिलाची रक्कम लगेच दिसते. नेट बँकिंग किंवा युपीआयद्वारे घरबसल्या बिल भरता येते.
६१ कोटींची कर वसुली
महापालिकेच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात ७२,०६६ करदात्यांनी कर भरला, ज्यामुळे ६१.१८ कोटी रुपयांची वसुली झाली. शास्तीमाफी योजनेत १६,७८७ करदात्यांनी सहभाग घेत १७.१८ कोटींचा कर भरला. यामुळे एकूण ८०.५८ कोटींची वसुली झाली, तर १९.३९ कोटींची सवलत देण्यात आली. विशेष म्हणजे, ज्यांना घरी बिल मिळाले नाही, त्यांनाही महापालिकेच्या संकेतस्थळावरून बिल पाहता आणि भरता येते. संकेतस्थळावर मुख्य पृष्ठावर ‘घरपट्टी विभाग’ हा पर्याय आहे. त्यावर क्लिक करून ‘मालमत्ता बिल कर भरणा’ या पर्यायावर गेल्यावर मालमत्ता क्रमांक टाकून बिलाची माहिती मिळते आणि ते ऑनलाइन भरता येते.
सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन
महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले की, डिजिटल युगात नागरिकांना सेवा अधिक सुलभ मिळाव्यात, यासाठी ऑनलाइन कर भरण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनीही या सुविधेचे स्वागत केले आहे. सध्या सर्वसाधारण करावर १० टक्के सवलत आहे, त्यामुळे मालमत्ताधारकांनी वेळेत कर भरून या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. ही सुविधा नागरिकांसाठी किती फायदेशीर आहे, हे १७ हजार लोकांनी ऑनलाइन कर भरून दाखवून दिले आहे.