Ahilyanagar News: अहिल्यानगर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त चोंडी (ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) येथे उद्या, मंगळवारी (दि. ६ मे २०२५) मंत्रिमंडळाची विशेष बैठक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी १२:३० वाजता या बैठकीला सुरुवात होईल. सुमारे दीड तास चालणाऱ्या या बैठकीसाठी चोंडीत ‘जर्मन हँगर’ प्रकारचा भव्य मंडप उभारण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासनाने या कार्यक्रमासाठी साडेतीन हजार खुर्च्यांची व्यवस्था केली असून, नियोजनासाठी तब्बल दोन कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या बैठकीसाठी जोरदार तयारी सुरू असून, अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासाला चालना देणाऱ्या अनेक घोषणा अपेक्षित आहेत.

Ac रूम्स, खास भोजन कक्षासह जर्मन हँगरचा भव्य मंडप
चोंडीतील या मंत्रिमंडळ बैठकीसाठी जिल्हा प्रशासनाने चोख नियोजन केले आहे. मंत्र्यांसाठी, सचिवांसाठी आणि आमदारांसाठी वातानुकूलित कक्ष उभारण्यात आले आहेत. यासाठी आगप्रतिबंधक प्लास्टिक फायबरचा वापर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसाठी खास ग्रीन रूम, भेटीसाठी येणाऱ्या आमदार-खासदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष, मुख्य सचिवांचे कार्यालय, मंत्रिपरिषद सभागृह, स्वयंपाकघर, भोजन कक्ष, पत्रकार कक्ष आणि सुरक्षा कर्मचारी तसेच वाहनचालकांसाठी वेगवेगळे कक्ष उभारले गेले आहेत.
मंडपात इंटरनेट (वाय-फाय) सुविधेसह पिण्याच्या पाण्याची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. साडेतीन हजार खुर्च्यांची व्यवस्था असलेला हा मंडप २६५ फूट लांब आणि १३२ फूट रुंद आहे, जो दरवर्षी अहिल्यादेवींच्या जयंतीसाठी वापरल्या जाणाऱ्या मैदानावर उभारण्यात आला आहे.
१२.३० ला बैठकीला होणार सुरूवात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी १२ वाजता हेलिकॉप्टरने चोंडीत दाखल होणार आहेत. सर्वप्रथम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सूतगिरणीचे उद्घाटन होईल. त्यानंतर संपूर्ण मंत्रिमंडळ अहिल्यादेवींच्या स्मारकाला अभिवादन करेल. यानंतर दुपारी १२:३० वाजता मंत्रिमंडळ बैठकीला सुरुवात होईल. बैठकीनंतर सर्व मंत्र्यांसह आमदार, अधिकारी आणि पाहुण्यांसाठी भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानंतर मुख्यमंत्री आणि इतर मान्यवर पुढील कार्यक्रमासाठी अहिल्यानगर येथे हेलिकॉप्टरने रवाना होतील.
१७ समित्यांची स्थापना
या बैठकीसाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी १७ समित्यांची स्थापना करून नियोजनाची जबाबदारी सोपवली आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि सुमारे ६०० व्हीव्हीआयपी पाहुण्यांच्या भोजनाची जबाबदारी बचत गटातील महिलांना देण्यात आली आहे. या भोजनात अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रसिद्ध पदार्थांचा समावेश असेल. शिपी आमटी, आमरस, शेंगुळे, थालीपीठ, वांग्याचे भरीत, डाळबट्टी, दही धपाटे यासह १५-२० पारंपरिक पदार्थांचा समावेश आहे. या पाहुणचारातून जिल्ह्याच्या खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडणार आहे.
ही बैठक अहिल्यानगर जिल्ह्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. या बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सृष्टी, संत ज्ञानेश्वर सृष्टी, भुईकोट किल्ला संवर्धन, श्रीगोंदा येथील पेडगाव किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज स्मारक आणि जिल्ह्यातील प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी मोठ्या निधीची घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच, जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठीही भरीव निधी मंजूर होऊ शकतो. या सर्व योजनांमुळे जिल्ह्याच्या सांस्कृतिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.