शेतकऱ्याने पोटच्या पोरांसारखी भर उन्हाळ्यात डाळिंबाची निगा राखली, चोरांनी रात्रीचा डाव साधत दीड लाख रूपयांच्या डाळिंबाची चोरी केली

शेतकरी चंद्रकांत शिंदे यांनी दीड लाखांची डाळिंबांची बाग कुटुंबाच्या भवितव्यासाठी जोपासली होती. मुलाच्या वाढदिवशी घरात राहून चोरांनी त्यांची मेहनत लुटली. ग्रामस्थांचा अंदाज, चोरी गावातीलच असावेत.

Published on -

Ahilyanagar News: अहिल्यानगर- दगडवाडी येथील शेतकरी चंद्रकांत विष्णू शिंदे यांच्या डाळिंब बागेतून चोरांनी सुमारे दीड लाख रुपये किमतीची डाळिंबे चोरली. मुलाच्या वाढदिवसानिमित्त एक रात्र घरी थांबलेली त्यांना चांगलीच महागात पडली. तीन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर फुलवलेली ही बाग त्यांच्यासाठी केवळ शेती नव्हती, तर भावनिक नात्याचा हिस्सा होती. शुक्रवारी (दि. २ मे २०२५) रात्री चोरांनी त्यांच्या अनुपस्थितीचा फायदा घेत हा डाव साधला. या घटनेमुळे शिंदे कुटुंबीय हादरले असून, गावकऱ्यांमध्येही संतापाची लाट पसरली आहे.

भर उन्हाळ्यात टँकरने पाणी

चंद्रकांत शिंदे यांनी दोन एकर जागेत डाळिंबाची बाग तयार करण्यासाठी जीवापाड मेहनत घेतली. गेल्या दोन-तीन वर्षांपासून त्यांनी सण-उत्सव, सुख-दु:खाच्या प्रसंगांकडे दुर्लक्ष करत बागेची काळजी घेतली. रात्रीचा मुक्कामही बागेतच असायचा. पाण्याची टंचाई असताना टँकरने पाणी विकत घेऊन त्यांनी बाग जगवली. संपूर्ण कुटुंबाने रात्रंदिवस मेहनत घेतल्याने ही बाग परिसरातील निवडक उत्कृष्ट बागांपैकी एक बनली होती.

दीड लाख रूपयांची चोरी

मात्र, मुलाच्या वाढदिवसानिमित्त कुटुंबाच्या आग्रहाखातर चंद्रकांत शिंदे शुक्रवारी रात्री घरी थांबले. रात्री उशिरा गोडधोड जेवण करून सर्वजण झोपी गेले. त्यांना रात्रभर झोप लागली नाही, तरीही सकाळी लवकर उठून ते बागेत गेले. तिथे गेल्यावर त्यांना धक्काच बसला. चोरांनी रात्रीच्या अंधारात ४० ते ५० कॅरेट डाळिंबे चोरली होती, ज्याची बाजारातील किंमत दीड लाख रुपयांहून अधिक होती. झाडांची निगा राखताना त्यांनी शेतीला आरशासारखी स्वच्छ ठेवली होती. डाळिंबाच्या झाडांशी त्यांचे भावनिक नाते जडले होते. पण चोरांनी त्यांच्या अनुपस्थितीचा फायदा घेत सर्व स्वप्ने उद्ध्वस्त केली.

परिसरातील चोरांनीच डाव साधल्याचा संशय

या चोरीमुळे शिंदे कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. गावकऱ्यांचा अंदाज आहे की, चोर हे परिसरातीलच असावेत, कारण शिंदे यांच्या घरी थांबण्याच्या माहितीवरूनच त्यांनी हा डाव साधला. रात्री बागेत कुणीही नसल्याची खात्री करून चोरांनी ही चोरी केल्याचे दिसते. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या चोरीच्या घटनेने स्थानिक प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मालमत्तेच्या सुरक्षेसाठी पुरेशी यंत्रणा नसल्याची खंत व्यक्त होत आहे. शिंदे यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली असून, चोरांचा शोध घेण्याची मागणी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe