Mumbai Railway : मुंबईतील सामान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी नव्या रेल्वे मार्गिका उभारण्याचे काम वेगाने सुरू होत आहे. सध्या बोरिवली ते विरार पाचवी-सहावी मार्गिका आणि कल्याण ते कसारादरम्यान तिसऱ्या मार्गिकाचे काम सुरू आहे. आता या प्रकल्पाचा आणखी एक टप्पा पुढे सरकणार आहे. या दोन्ही मार्गिकाच्या कामासाठी २९.३२ हेक्टर वनजमिनींवरील झाडे तोडण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास जलद होणार असला तरी परिसर मात्र उजाड होणार आहे.
किती झाडे तोडणार?
कल्याण ते कसारा या तिसऱ्या मार्गिकेसाठी ठाणे जिल्ह्यातील 17 गावांतील 16.54 हेक्टर जमिनीवरील झाडे तोडली जाणार आहेत. ठाण्यातील मुख्य वन संरक्षकांनी सशर्त काम सुरू करण्याची परवानगी दिली आहे. 5 डिसेंबर 2025 पर्यंत ही परवानगी वैध असेल. वनक्षेत्रात काम करताना नैसर्गिक जलस्रोतांचे प्रवाह बंद होणार नाहीत, याची दक्षता घेण्याची सूचना वन विभागाने मध्य रेल्वेला दिल्या आहेत. या प्रकल्पासाठी 792 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

काय फायदा होणार?
कल्याण ते कसारादरम्यान नव्या मार्गिका सुरू झाल्यानंतर या मार्गावर लोकल फेऱ्या वाढणार आहेत. 15 डब्यांच्या लोकल फेऱ्या चालवण्यासाठी अतिरिक्त मार्गिका महत्त्वाचा टप्पा आहे. अनेकदा मेल आणि एक्स्प्रेसमुळं लोकल रखडतात. या मार्गिकेमुळं लोकलचा वेग वाढणार आहे. बोरिवली ते विरार पाचव्या व सहाव्या मार्गिकेचे काम सध्या सुरू असून या प्रकल्पासाठी 2,184 कोटींचा खर्च येणार आहे. या नव्या मार्गिकेनंतर मुंबई सेंट्रल ते विरारपर्यंत सहा मार्गिका उपलब्ध होणार आहेत.
कांदळवनावर कुऱ्हाड पडणार
उपनगरातील दहिसर गावातील ३.६८ हेक्टर, ठाण्यातील पेणकर पाडा परिसरातील १.४२ हेक्टर आणि पालघरमधील उमेळे गावातील ७.६६ हेक्टर कांदळवनांवर घाव घालून त्या जमीनी सपाट करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारसह राज्य सरकारी पर्यावरण विभागाने सार्वजनिक हिताच्या प्रकल्पासाठी झाडे तोडण्याकरता अंतिम मंजुरी दिली आहे. यामुळे येत्या काही दिवसांत कांदळवने हटवून त्या ठिकाणी रेल्वे मार्गिका उभारणीचे कामे सुरू करण्यात येणार आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.