शंभुराजांनी आपल्या आयुष्यात 112 लढाया केल्या. त्यापैकी ते एकही लढाई हरले नाहीत. हंबीरराव मोहिते जिवंत असते, तर संभाजी महाराज पकडलेच गेले नसते, असा दावा इतिहासकार व साहित्यिक विश्वास पाटील यांनी केला. अहिल्यानगर जिल्ह्यातील चिचोंडी पाटील येथे आयोजित प्रबोधन मंच व सावरकर वाचनालय आयोजित प्रबोधन व्याख्यानमालेत ते बोलत होते.
या कार्यक्रमात चिचोंडी पाटील येथील नवोदित लेखक मारुती खडके यांच्या परांगणा या कादंबरीचे प्रकाशन पाटील यांच्या हस्ते झाले. या व्याख्यानात बोलताना विश्वास पाटील यांनी पुन्हा इतिहास जिवंत केला.

ते म्हणाले, छावा चित्रपटात खूप काही मांडलं गेलं. परंतु खूप काही उरलंही आहे. संभाजी हा विषय चित्रपटात मावणारा नाही. परंतु एक झाले की छावा चित्रपटामुळे फक्त महाराष्ट्राला माहित असलेले शंभुराजे सर्व जगाला समजले.
विश्वास पाटील पुढे म्हणाले की, शूर संभाजीराजे फक्त फंदफितुरीमुळे पकडले गेले. छत्रपती शिवराय व शंभुराजे यांचे नाते जिवाशिवाचे होते. परंतु काही नाटककारांनी इतिहास रंजक करण्याच्या नादात शंभुराजे व कवी कलश यांचे विपर्यस्त चित्रण उभे केले. त्यांना बदफैली ठरवले. वास्तविक शंभुराजे असे नव्हते. आपल्या आयुष्यात त्यांनी 112 लढाया केल्या. त्यापैकी फक्त एका लढाईत ते हरले.
पकडले गेले तेव्हा औरंगजेबाने त्यांना किल्ले मागितले. धर्मांतर करण्याची अट घातली. परंतु स्वाभिमानी शंभुराजांनी ती तडजोड फेटाळली म्हणून त्यांना स्वराज्यासाठी बलिदान द्यावे लागले. हंबीरराव मोहिते जिवंत असते तर संभाजीराजे पकडलेच गेले नसते, असा दावाही विश्वास पाटील यांनी केला.