Land Rover Defender : भारत आणि युनायटेड किंग्डम (UK) दरम्यान नुकताच जाहीर झालेला मुक्त व्यापार करार (Free Trade Agreement – FTA) ही देशातील लक्झरी कार खरेदीदारांसाठी अत्यंत महत्त्वाची घडामोड ठरत आहे. या करारामुळे भारतात आयात होणाऱ्या ब्रिटिश लक्झरी कार्सच्या किमतीत लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे. सध्या भारतात या वाहनांवर 100% किंवा त्याहून अधिक आयात शुल्क आकारले जाते, परंतु FTA अंतर्गत हे शुल्क केवळ 10% पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.
‘या’ गाड्या होणार स्वस्त-
या निर्णयाचा थेट फायदा Land Rover, Bentley, Aston Martin, Rolls-Royce आणि Mini यांसारख्या UK मधून आयात होणाऱ्या कार उत्पादकांना होईल. सध्या या गाड्या CBU (Completely Built Unit) स्वरूपात आयात केल्या जात असल्याने त्यांची किंमत प्रचंड असते. पण आता हे चित्र बदलण्याची शक्यता आहे.

Land Rover Defender ही एक अत्यंत लोकप्रिय लक्झरी SUV असून सध्या तिची भारतातील किंमत सुमारे 1.24 कोटी रुपये आहे. याच Defender 110 मॉडेलची अमेरिकेत किंमत सुमारे \$60,800 आहे, म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये सुमारे 52.31 लाख रुपये. जर भारतात FTA अंतर्गत आयात शुल्क फक्त 10% झाले, तर ही गाडी सुमारे 60 लाख ते 65 लाख रुपये (ऑन-रोड, मुंबई) दरम्यान मिळू शकते. म्हणजेच, Toyota Fortuner पेक्षा कमी किमतीत आता Defender मिळण्याची शक्यता आहे.
हे शुल्क सवलत काही कोट्यांअंतर्गत दिली जाणार असून त्यांची मर्यादा आणि पात्रता लवकरच स्पष्ट होईल. त्यामुळे ही सवलत प्रत्येक कार खरेदीदाराला लागू होईल की नाही, हे पुढील घोषणांनंतरच समजू शकेल.
भारतीय कंपन्यांना होणार फायदा-
या निर्णयामुळे भारतीय कार उत्पादक देखील अधिक आत्मविश्वासाने जागतिक बाजारपेठेत पाऊल ठेवण्याची योजना आखत आहेत. महिंद्रा आपल्या BE आणि XUV.e मालिकेतील मॉडेल्सना उजव्या हाताच्या ड्राइव्ह असलेल्या देशांमध्ये निर्यात करण्याचा विचार करत आहे. TVS Motor आणि Tata Motors यांनीही UK मधील संधींचा फायदा घेण्यासाठी नवीन योजनेची आखणी केली आहे.
या ऐतिहासिक व्यापार करारामुळे भारतात लक्झरी वाहनांची उपलब्धता अधिक सुलभ आणि परवडणारी होणार आहे. परिणामी, उच्च दर्जाच्या युरोपियन गाड्या खरेदी करण्याचे स्वप्न आता अनेक भारतीय ग्राहकांसाठी साकार होण्याची शक्यता आहे.