अहिल्यानगर – महानगरपालिका प्रशासनाने शहरातील १५ अतीधोकादायक अवस्थेतील इमारती पडण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. यात बहुतांश इमारती या मध्य शहरातील आहेत व त्यातील काहींचा वापरही सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी या इमारती उतरवून घेण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी बांधकाम विभागाला दिले आहेत. नागरिकांनी धोकादायक अवस्थेतील इमारती स्वतःहून काढून घ्याव्यात, अन्यथा महानगरपालिका कारवाई करून काढतील, असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण करा, ड्रेनेज लाईन दुरुस्तीची कामे पूर्ण करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी गुरुवारी महानगरपालिकेत मान्सून पूर्व कामांचा आढावा घेतला. बैठकीस उपायुक्त विजयकुमार मुंडे, संतोष टेंगळे, शहर अभियंता मनोज पारखे यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. शहरातील धोकादायक इमारतींवर सुरू असलेल्या कारवाईचा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी आढावा घेतला. धोकादायक अवस्थेत असलेल्या शहरातील १९७ इमारतींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच, १६ धोकादायक इमारतींबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.

तर, १५ इमारती अती धोकादायक अवस्थेत असल्याचे बांधकाम विभागाने स्पष्ट केले. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी या धोकादायक इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच, इमारत मालकांनाही स्वतःहून इमारती काढून घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच, १९७ इमारतींना नोटिसा बजावून त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे व अहवाल सादर करण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आलेले आहेत. या इमारत मालकांनाही दुरुस्ती अथवा धोकादायक भाग उतरवून घेण्यासाठी सूचना द्याव्यात, असे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.
मान्सून पूर्व कामांचा आढावा घेताना शहरातील झाडांच्या धोकादायक अवस्थेत असलेल्या फांद्या काढण्याचे, धोकादायक झाडे काढण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. पावसाळ्यात नाल्या, गटारी तुंबणार नाही, या दृष्टीने त्यांची साफसफाई करून घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. ड्रेनेज लाईन, चेंबर दुरुस्ती करून घ्यावी, ड्रेनेज लाईनची साफसफाई करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले. नागरिकांना पावसाळ्यात अडचण होऊ नये, यासाठी प्रलंबित रस्त्यांची कामे पूर्ण करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.