7th Pay Commission : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता हा नेहमीच चर्चेचा विषय राहतो. हा विषय सरकारी नोकरदार मंडळीचा अगदीच जिव्हाळ्याचा आहे. खरे तर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळतो. पहिला लाभ जानेवारी महिन्यापासून आणि दुसरा लाभ जुलै महिन्यापासून दिला जातो.
या चालू वर्षात म्हणजेच 2025 मध्ये आतापर्यंत एकदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळालेला आहे. जानेवारी 2025 पासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. आधी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% एवढा होता मात्र यामध्ये दोन टक्क्यांची वाढ झाली आणि हा भत्ता 55% एवढा झाला.

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55% करण्याबाबतचा निर्णय मार्च महिन्याच्या शेवटी झाला असून ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली आहे म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळालेली आहे. दुसरीकडे आता जुलै महिन्यापासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता किती वाढणार याबाबतही मोठी अपडेट समोर आली आहे.
किती वाढणार महागाई भत्ता
सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता किती वाढणार हे एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार ठरत असते. जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीमधील एलआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार जानेवारी 2025 पासूनचा महागाई भत्ता ठरला.
आता जानेवारी 2025 ते जून 2025 या कालावधी मधील एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार जुलै 2025 पासून महागाई भत्ता किती वाढणार हे निश्चित होणार आहे. दरम्यान आत्तापर्यंत जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च 2025 या कालावधीमधील एआयसीपीआयची आकडेवारी समोर आली असून जुलै महिन्यापर्यंत एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांची आकडेवारी सुद्धा समोर येणार आहे.
जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात एआयसीपीआयचे निर्देशांक खाली जात होते. मात्र मार्च 2025 मध्ये, हे CPI-IW चे निर्देशांक 0.2 अंकांनी वाढून 143.0 पर्यंत पोहोचले आहेत. हे निर्देशांक गेल्या दोन महिन्यांपासून खाली जात होते, पण आता ते थोडे वर आले आहे, यामुळे महागाई भत्ता वाढीच्या अनुषंगाने ही एक चांगली गोष्ट ठरली आहे.
मार्च महिन्याच्या या ताज्या आकडेवारीनुसार, असे दिसते की जुलै 2025 पासून कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळालेला DA/DR सुमारे 57.91% असू शकतो. म्हणजेच यावेळी महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढू शकतो.
अर्थातच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जुलै महिन्यापासून 55 टक्क्यांवरून 58 टक्क्यांवर पोहोचणार आहे आणि यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळेल अशी आशा आहे. पण हो, हे अजून निश्चित झालेले नाही.
जेव्हा बाकीच्या तीन महिन्यांची म्हणजेच एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांची एआयसीपीआयची आकडेवारी समोर येईल तेव्हाच महागाई भत्ता नेमका किती वाढणार हे स्पष्ट होणार आहे.
महागाई भत्ता वाढ कशी ठरवली जाते ?
महागाई भत्ता किती वाढणार ? याचे एक निश्चित सूत्र आहे. सातव्या वेतन आयोगात हे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. या फॉर्म्युल्यानुसार गेल्या 12 महिन्यांच्या CPI-IW डेटाच्या सरासरीवर महागाई भत्ता किती वाढणार हे ठरवले जाते.
सातव्या वेतन आयोगाच्या महागाई भत्ता वाढीच्या सूत्र हे DA % = [(गेल्या 12 महिन्यांतील सरासरी AICPI-IW) -261.42]/261.42 × 100 असे आहे. येथे 261.42 ही तीच संख्या आहे जी 7 व्या वेतन आयोगाचा टाईम बेस मानली गेली होती.