हिमाचल प्रदेशात अनेक थंड हवेची ठिकाणे आहे. अनेकजण तेथे उन्हाळ्यात फिरायला जातात. देशात इंटरनेट आल्यापासून देशातील अनेक दुर्लक्षित हिल स्टेशनची माहिती सामान्यांपर्यंत पोहचली आहे. हिमाचलमध्ये असेच एक हिलस्टेशन आहे, जे पाहिल्यावर माणूस शिमला, मनालीही विसरतो. कोणते आहे हे हिलस्टेशन, तेच आपण या बातमीतून पाहू…
कुठे आहे गुलाबा?
गुलाबा हिल स्टेशन हे मनालीपासून फक्त 20 किलोमीटर अंतरावर आहे. ते समुद्रसपाटीपासून 4 हजार मीटर उंचीवर आहे. या गावाचे सौंदर्य वर्षभर अबाधित राहते. हिवाळ्यात हे ठिकाण बर्फाच्या चादरीने झाकलेले असते. उन्हाळ्यात ते हिरवळीने भरलेले राहते. जम्मू आणि काश्मीरचे राजा गुलाब सिंग यांच्या नावावरून या हिल स्टेशनचे नाव गुलाबा पडले.

काय आहे पाहण्यासारखे?
सुंदर पर्वत, दऱ्या, बर्फ, निसर्ग हे पाहण्याव्यतिरिक्त तुम्ही येथे साहसी खेळही खेळू शकता. येथे तुम्ही स्कीइंग, हायकिंग, ट्रेकिंग आणि पॅराग्लायडिंग सारख्या गोष्टींचा आनंद घेता येतो. येथे खूप शांतता आहे. तुम्ही इथे येऊन शांततेचे क्षण घालवू शकता आणि भरपूर आनंद घेऊ शकता. बर्फवृष्टीत खेळू शकता. हे हिल स्टेशन रोहतांग पास मार्गावर आहे. पर्यटकांना येथे दूरवर पसरलेले बर्फाच्छादित पर्वत पाहता येतात.
कसे जायचे?
दिल्लीहून गुलाबा येथे जाण्यासाठी येथे थेट बस मिळेल. याशिवाय, तुम्ही मनालीहून टॅक्सीनेही येथे पोहोचू शकता. जर तुम्हाला हे ठिकाण बाईकने फिरायचे असेल तर तुम्ही चंदीगडहून बाईक भाड्याने घेऊ शकता. याशिवाय देशाच्या प्रत्येक ठिकाणावरुन बस, ट्रेन किंवा विमानाने तुम्हाला येथे जाता येईल. हे ठिकाण एकदा पाहिल्यावर तुम्हाला पृथ्वीवरचा स्वर्गच पाहत आहोत, असा भास होईल.