Ahilyanagar News : हिमाचल प्रदेशमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या प्रवाशांना खासदार नीलेश लंके यांच्या माध्यमातून धर्मशाला येथील एचपीसीए क्रिकेट मैदान पाहण्याची संधी मिळाली. भारत-पाकीस्तानमधील तणावाच्या पार्श्वभुमीवर हे क्रिकेट मैदान बंद असल्याने पर्यटकांना ते पाहण्यासाठी मनाई करण्यात आली होती. मात्र खा. लंके यांच्या शिष्टाईमुळे पर्यटकांना हे मैदान पाहण्याची संधी लाभली.
पारनेर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते व निवृत्त शिक्षक धर्माजी तथा बाळासाहेब मते, त्यांच्या पत्नी तथा पारनेरच्या माजी सरपंच वैजयंता मते, शहाजी देशमाने, आदिनाथ ढेरे, कानिफनाथ गायकवाड, सुर्यकांत काळे, लहू थोरात, संतोष दिवटे, किरण पायमोडे, मीरा पुजारी, मंदाकिनी गायकवाड यांच्यासह तालुक्यातील ५० शिक्षक व त्यांचे कुटूंबीय ट्रॅव्हल्स कंपनीचे रामदास आंधळे यांच्या माध्यमातून सिमला, कुलू, मनालीच्या दौऱ्यावर आहेत.

हे पर्यटक धर्मशाला येथील सर्वात उंचीवर असलेले क्रिकेटचे स्टेडियम पाहण्यासाठी गेले असता ते बंद होते. तेथील सुरक्षा रक्षकांनी त्यांना आत प्रवेश देता येणार नाही असे बजावले. सर्वात उंचीवरील स्टेडियम पाहण्याची संधी मिळणार नाही या कारणामुळे पर्यटक हिरमुसले होते. मात्र बाळासाहेब मते यांनी त्यावर तोडगा काढला आणि सर्व पर्यटकांनी मते यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
धर्माजी मते यांनी खा. नीलेश लंके यांचे सहकारी ॲड. राहुल झावरे यांच्याशी संपर्क करून धर्मशाला येथील स्टेडियम पाहण्यासाठी मदत करण्याची मागणी केली. ॲड. झावरे यांनी तात्काळ खा. लंके यांचे नवी दिल्ली येथील स्वीय सहाय्यक सचिन टकले यांच्याशी संपर्क केला.
ॲड. झावरे व टकले यांनी यासंदर्भात खा. नीलेश लंके यांच्याशी संपर्क केल्यानंतर खा. लंके यांनी कांग्रा येथील स्थानिक खासदार राजीव शर्मा यांच्याशी संपर्क करून माझ्या मतदारसंघातील शिक्षक पर्यटनासाठी आपल्या भागात आले असून त्यांना स्टेडियम पाहण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. त्यांना आपण हे स्टेडीयम खुले करून देण्याचे साकडे असे खा. लंके यांनी घातले. त्यावर स्टेडियम प्रशासनाशी खा. राजीव शर्मा यांनी संपर्क करून या शिक्षकांसाठी स्टेडीयम खुले करून देण्यात आले.
खा. लंके यांच्याप्रती कृतज्ञता
हे स्टेडीयम पाहण्यासाठी खुले करण्यात आल्यानंतर पर्यटकांनी आनंद व्यक्त केला. जिथे आपले प्रयत्न संपतात तिथे खासदार नीलेश लंके हे मदतीला धाऊन येतात असे सांगत या पर्यटकांनी खा. लंके यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत स्टेडीयममध्ये लंके यांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या.
खा. नीलेश लंके यांच्या माध्यमातून धर्मशाला येथील क्रीकेट मैदान पाहण्याची संधी तालुक्यातील पर्यटकांना मिळाली.