Vande Bharat Express : देशातील वंदे भारत एक्सप्रेसचे नेटवर्क आणखी मजबूत होणार आहे. सध्या स्थितीला संपूर्ण देशात 136 वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत आणि ही संख्या आता आगामी काळात आणखी वाढणार आहे. कारण की, रेल्वेच्या माध्यमातून देशभरातील विविध राज्यांमध्ये वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्या जात आहेत.
आपल्या महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्यात आतापर्यंत 11 वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्या असून या गाड्यांना राज्यातील प्रवाशांच्या माध्यमातून चांगला अभूतपूर्व प्रतिसाद सुद्धा मिळतोय. राज्यातील सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते जालना,

सीएसएमटी ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, नागपूर ते बिलासपूर, नागपूर ते इंदोर, नागपूर ते सिकंदराबाद, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू आहे.
महत्वाची बाब अशी की आगामी काळात पुणे ते नागपूर या मार्गावर सुद्धा वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता मीडिया रिपोर्ट मध्ये वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे आता देशातील आणखी एका महत्त्वाच्या मार्गावर वंदे भारत ट्रेन चालवण्याची रेल्वेची योजना असल्याची बातमी समोर आली आहे.
रेल्वे कडून पटना ते गोरखपुर दरम्यान वंदे भारत ट्रेन चालवली जाणार असून आज आपण याच नव्या प्रस्तावित वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळापत्रकासंदर्भात, तसेच ही गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
या गाडीच्या संभाव्य तिकीट दराबाबतही एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे, आज आपण या संदर्भातही सविस्तर माहिती समजून घेऊयात.
कस राहणार वेळापत्रक ?
प्रस्तावित वेळापत्रकानुसार, गोरखपुर पटना वंदे भारत एक्सप्रेस सकाळी सहा वाजता गोरखपुर रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे आणि अकरा वाजता ही गाडी पटना रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
पटना गोरखपूर वंदे भारत एक्सप्रेस बाबत बोलायचं झालं तर ही गाडी दुपारी दोन वाजता पटना रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे आणि रात्री आठ वाजता गोरखपूर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
कोण – कोणत्या स्थानकावर थांबा घेणार नवीन वंदे भारत?
मीडिया रिपोर्टनुसार गोरखपुर – पटना आणि पटना – गोरखपुर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन या मार्गावरील काही महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेणार आहे. गोरखपुर, पटना आणि मुजफ्फरपुर सारख्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर ही गाडी थांबा घेईल अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आलीये.
तथापि, या संदर्भात अजून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही त्यामुळे या गाडीला कोणकोणत्या स्थानकावर थांबा मंजूर होईल हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.
तिकीट दर कसे राहणार ?
गोरखपुर ते पटना या पाचशे किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गावर लवकरच वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे. दरम्यान या प्रस्तावित वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनने गोरखपुर ते पटना असा प्रवास केला तर तिकीट दर हे सहाशे रुपये इतके राहणार आहेत. तसेच मुजफ्फरपुर ते गोरखपुर यादरम्यान प्रवास केल्यास प्रवाशांना 480 रुपयांचे तिकीट काढावे लागू शकते.