Ahilyanagar News : अकोले तालुक्यातील मुतखेल हे भंडारदरा धरणाच्या काठावर वसलेले गाव. या गावातील समीर विठ्ठल ईदे हा जन्मतःच अपंग. याला कोपरापासून दोन्हीही हात नाहीत. तरीही समीर आपल्या जिद्दीच्या जोरावर दहावीच्या शालांत परीक्षेत विद्यालयामध्ये तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला.
समीर हा एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्माला आलाय. वडील विठ्ठल हे थोड्याफार शेतीवरच आपला कुटुंबाचा गाडा चालवतात. या कुटुंबात जन्माला आलेल्या समीरचे पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुतखेल येथे झाले. शिक्षण हे वाघिणीचे दूध असते याचे बाळकडू त्याला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतच मिळाले. मुतखेल शाळेचे मुख्याध्यापक किसन दराने यांनी समीरला योग्य दिशा देत सातवीपर्यंत अगदी अभ्यासात हुशार केले. हाच समीर त्यानंतर आठवीला

शासकीय आश्रमशाळा मुतखेल येथे जाऊ लागला. येथेही समीरने आपल्या शिक्षणात आपले अपंगत्व अडचण ठरणार नाही याची काळजी घेत जिद्दीने अभ्यास केला. समीरला शिक्षणासाठी कोणतीही अडचण येऊ नये याची काळजी घेतली त्याच्या वर्गशिक्षिका सुजाता झेंडे यांनी घेतली. समीर हा दहावीच्या परीक्षेमध्ये निश्चितच यश मिळू शकतो याचा सुजाता झेंडे व त्याच्या शिक्षकांना विश्वास होता.
समीरला कोपरापासून खाली हात नाहीत. मात्र आपले हात आपली अडचण न ठरवता समीर त्या कोपराच्या सहाय्यानेच सुंदर अक्षर गिरवतो. त्याचे हस्ताक्षर सुंदर आहे. समीरने दहावीच्या परीक्षेत ७३.८० टक्के गुण मिळवून विद्यालयामध्ये तिसरा येण्याचा मान मिळविला आहे. समीरच्या या यशामध्ये विद्यालयाचे प्राचार्य बारामती, अधीक्षक जगदीश बेळगे, मुलींच्या अधीक्षक सुरेखा रासने, वर्गशिक्षिका सुजाता झेंडे, बाबासाहेब लोंढे, जनार्धन मगर, रणजीत बागुल, शिंदे ताई यांच्यासह इतर शिक्षक व व शिक्षकेतर कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे.
विज्ञान शाखेतून घ्यायचेय शिक्षण
समीर हा अतिशय गुणी आणि हुशार विद्यार्थी असून या विद्यार्थ्यांच्या हातावर जर शस्रक्रिया झाली तर निश्चितच समीरला सामान्य जीवन जगण्यास मदत होणार आहे. यासाठी सेवाभावी संस्थांनी समीरच्या मदतीला पुढे येण्याची खरी गरज आहे. भविष्यात समीरला विज्ञान शाखेतून प्रवेश घ्यायचा असून त्याला ज्ञानदानाच्या भूमिकेत आपल्याला शिक्षणाचे धडे द्यायला आवडेल असे समीर अभिमानाने सांगतोय. आपल्या अपंगत्वाच्या जोरावर समीरने मिळविलेले हे यश निश्चितच अनमोल असून समीरला शिकण्याची भरपूर जिद्द आ