अहिल्यानगर : महानगरपालिकेच्या पथदिव्यांच्या खांबावरील टीव्ही केबल व इंटरनेट केबल तात्काळ काढाव्यात

विनापरवाना टाकलेल्या केबल तोडण्याची कारवाई महानगरपालिकेकडून सुरू , विनापरवाना केबल टाकणाऱ्या कंपन्यांवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करणार : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे

Published on -

अहिल्यानगर : शहरातील महानगरपालिकेच्या मालकीच्या पथदिव्यांच्या खांबावरील इंटरनेट व टीव्ही केबल, तसेच इतर वाहिन्या संबंधितांनी तत्काळ काढून घ्याव्यात. महानगरपालिकेने विनापरवाना केबल टाकणाऱ्या कंपन्यांवर कारवाई सुरू केली आहे. विनापरवाना केबल तोडून हटवण्यात येत आहेत. त्यामुळे संबंधितांनी तात्काळ अनधिकृत केबल काढून घ्याव्यात, अन्यथा कायदेशीर व दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.

अहिल्यानगर शहरात सर्वत्र महानगरपालिकेचे पथदिव्यांचे खांब आहेत. शहरातील जाणाऱ्या प्रमुख रस्ते व महामार्गांवरही पथदिव्यांचे खांब आहेत. अनेक टीव्ही केबल कंपन्या व इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडून त्यांच्या केबल टाकण्यासाठी बेकायदेशीरपणे महानगरपालिकेच्या खांबांचा वापर केला जात आहे.

सदर खांबांवरून महानगरपालिकेच्या पथदिव्यांच्या वीज वाहक तारा टाकलेल्या असतात. त्याच ठिकाणी कोणतीही परवानगी न घेता धोकादायक पद्धतीने या केबल टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे एखादा अपघात किंवा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पथदिव्यांच्या खांबांवरून या केबल हटवणे आवश्यक आहे.

त्यामुळे शहरातील सर्व टीव्ही व इंटरनेट केबल टाकणाऱ्या कंपन्यांनी तात्काळ सदरच्या केबल काढून घ्याव्यात. महानगरपालिकेने अशा केबल हटवण्यासाठी कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. या केबल कट करून काढण्यात येत आहेत. या कारवाईमुळे कोणतीही सेवा विखंडित झाल्यास, यामुळे कोणत्याही प्रकारचे व कोणाचेही नुकसान झाल्यास त्याला महानगरपालिका जबाबदार राहणार नाही.

ज्या केबल चालकांना अथवा इंटरनेट कंपन्यांना केबल टाकायच्या असतील, त्यांनी महानगरपालिकेकडे अर्ज करून परवानगी घ्यावी व निश्चित करून दिलेल्या जागांवरूनच केबल टाकण्यात यावी. अन्यथा महानगरपालिका संबंधित कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करेल. तसेच दंड ही आकारण्यात येईल व केबलही तोडून टाकण्यात येतील, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe