शेतकऱ्यांवर दुहेरी संकट! अवकाळी पावसानं झोडपलं आणि कांद्याने रडवलं, अहिल्यानगरच्या नेप्ती मार्केटमध्ये कांद्याला मिळतोय एवढा भाव

नेप्ती बाजारात कांद्याला १३०० रुपयांपर्यंतचा दर मिळाला असला तरी अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मागणीपेक्षा जास्त उत्पादन आणि दरातील अस्थिरतेमुळे शेतकरी दुहेरी संकटाचा सामना करत आहेत.

Published on -

Ahilyanagar News : अहिल्यानगर-  अहिल्यानगरमधील नेप्ती उपबाजारात कांद्याच्या भावाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. सोमवारी, १९ मे रोजी बाजार समितीत कांद्याची मोठी आवक झाली, पण भाव मात्र मातीमोल मिळाले. त्यातच अवकाळी पावसाने कांदा पिकाचे मोठे नुकसान केले आहे. एकीकडे नैसर्गिक संकट, तर दुसरीकडे बाजारात मिळणारे कमी भाव यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. यंदा कांद्याच्या लागवडीचे क्षेत्र वाढले असले तरी शेतकऱ्यांच्या हाती निराशाच पडत आहे.

कांद्याच्या भावात घसरण

नेप्ती उपबाजारात सोमवारी २२ हजार ६०२ क्विंटल गावरान कांद्याची आवक झाली. यावेळी एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल ११०० ते १३०० रुपये भाव मिळाला, तर दोन नंबर कांद्याला ८०० ते ११०० रुपये, तीन नंबर कांद्याला ५०० ते ८०० रुपये आणि चार नंबर कांद्याला २०० ते ५०० रुपये असा नाममात्र दर मिळाला. मागील वर्षी कांद्याला चांगला भाव मिळाल्याने यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने कांद्याची लागवड केली होती. पण सध्याच्या कमी भावामुळे त्यांचा हिरमोड झाला आहे. बाजार समितीत एकूण ४१ हजार ९५ गोण्या कांद्याची आवक झाली, पण भाव कोसळल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.

अवकाळी पावसाने नुकसान

यंदा रब्बी हंगामात अहिल्यानगर जिल्ह्यात सव्वादोन लाख हेक्टरवर कांद्याची लागवड झाली होती, जी मागील वर्षीच्या तुलनेत ५० हजार हेक्टरने जास्त आहे. शेतकऱ्यांनी कांद्याच्या लागवडीवर मोठी मेहनत आणि खर्च केला, पण अवकाळी पावसाने त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरवले. सततच्या पावसामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांचे कांदे सडले, तर काहींच्या पिकाची गुणवत्ता खालावली. यामुळे बाजारात कांद्याला चांगला भाव मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. 

इतर भाजीपाल्याचे भाव

कांद्याव्यतिरिक्त बाजार समितीत इतर भाजीपाल्याचीही आवक झाली. सोमवारी १४ हजार ७१५ जुड्या पालेभाज्यांची विक्रीसाठी आल्या. यामध्ये मेथीच्या ७४९३ जुड्यांना ९ ते १३ रुपये, कोथिंबिरीच्या ५९५२ जुड्यांना ३ ते १६ रुपये आणि पालकच्या ६५१ जुड्यांना ५ ते १० रुपये असा भाव मिळाला. याशिवाय २०७६ क्विंटल विविध भाजीपाल्याची आवक झाली, ज्यामध्ये ७०० क्विंटल बटाट्याला १२०० ते २५०० रुपये आणि ३२८ क्विंटल टोमॅटोला ४०० ते २००० रुपये भाव मिळाला. टोमॅटोच्या भावात किंचित वाढ दिसली, पण कांद्याच्या तुलनेत इतर भाजीपाल्याचे भावही शेतकऱ्यांना दिलासा देणारे नाहीत.

शेतकऱ्यांवर दुहेरी संकट

कांद्याच्या कमी भावामुळे आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना दुहेरी मार सहन करावा लागत आहे. मागील वर्षीच्या चांगल्या भावामुळे शेतकऱ्यांनी यंदा कांद्याची लागवड वाढवली, पण बाजारातील घसरण आणि पावसाने त्यांची मेहनत वाया गेली. शेतकरी कर्ज काढून शेती करतात, आणि आता कमी भावामुळे त्यांना कर्जाची परतफेड करणेही कठीण होत आहे. सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी उठवली असली तरी त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळताना दिसत नाही. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News