Explained : नगरच्या राजकारणात नवा चेहरा ! कर्डिले पुन्हा किंगमेकर ?

Published on -

Explained Nagar Politics : नगर तालुक्याच्या राजकारणाचा विचार केला तर, या तालुक्याचे राजकारण आ. शिवाजी कर्डिले यांच्याभोवतीच फिरते, असा इतिहास आहे. नगर तालुक्यातील गावे एक-दोन नाही तर, तीन विधानसभा मतदारसंघाला जोडली गेली आहेत. परंतु एकंदर तालुक्यातील सर्वच राजकारणात कर्डिलेंची पकड आहे. कर्डिले सध्या राहुरी मतदारसंघाचे आमदार असले तरी, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही कर्डिलेंची जादू चालेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. नगर तालुक्यात सात जिल्हा परिषद व 14 पंचायत समिती गणाच्या निवडणुकीत कशी आहे परिस्थिती? याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट…

नगर जिल्ह्यातील सर्वात जास्त तोडफोड केलेला तालुका म्हणजे नगर. नगर तालुक्यातील गावे एक-दोन नाही तर तीन विधानसभा मतदारसंघात विभागली गेली आहेत. म्हणजेच नगर तालुक्याचा विचार केला तर, नगर तालुक्यातील जनतेला तब्बल चार आमदार आहेत. राहुरी, श्रीगोंदा, पारनेर आणि नगर अशा चार आमदारांचा हा तालुका असल्याने येथे प्रत्येक निवडणूक ही चुरशीची होते.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महानगर पालिका क्षेत्रातील गावांचा समावेश नसला तरी, आ. शिवाजी कर्डिले, आ. काशिनाथ दाते आणि आ. विक्रम पाचपुते यांच्याभोवती जिल्हा परिषद व पंचायत समितीचे राजकारण फिरणार आहे. आत्तापर्यंतच्या निवडणुकांचा इतिहास पाहिला तर, आ. शिवाजी कर्डिले विरोधात महाविकास आघाडी हा पॅटर्न सर्वच निवडणुकांत दिसला आहे. परंतु काही दिवसांपूर्वी झालेल्या तालुक्यातील 27 पैकी 22 ग्रामपंचायती व नगर बाजार समितीवर आ. कर्डिले गटाने थेट ताबा मिळवला. कर्डिलेंच्या विरोधात प्राजक्त तनपुरे, खा. निलेश लंके, प्रा. शशिकांत गाडे तसेच शिवसेना व काँग्रेसचे नेते असूनही त्यांनी एकहाती किल्ला जिंकला.

तालुक्याचे आमदार म्हणून कर्डिलेंनी अनेक निवडणुकांचे नेतृत्व केले. आताही दोन वर्षांपूर्वी जाहीर झालेले आरक्षण कायम राहिले तर, निवडणुकीत रंगत येणार आहे. गेल्यावेळी जिल्हा परिषदेचे पाच गट व पंचायत समितीचे 10 गण होते. मतदारसंघाच्या पुनर्रचनेत, मात्र नगर तालुक्यात जिल्हा परिषदेचे सात गण व 14 गण झाले आहेत. गेल्यावेळी नगर पंचायत समितीत शिवसेना- काँग्रेसची सत्ता होती. तालुका विकास आघाडीने 12 पैकी 8 गणात विजय मिळवला होता. भाजपला फक्त 4 गणांत सरशी साधता आली होती. शिवसेनेच्या सुरेखा गुंड या सभापती तर डाँ. दिलीप पवार हे बिनविरोध उपसभापती झाले होते.

यंदा नगर तालुक्यातील राजकीय समि‍करणे बदलली आहेत. पारनेमधून काशिनाथ दाते, श्रीगोंद्यातून विक्रम पाचपुते व राहुरीतून स्वतः शिवाजी कर्डिले हे आमदार आहेत. त्यामुळे तालुक्यात भाजप व महायुतीचाच बोलबाला आहे. त्यामुळे यंदाच्या पंचायत समिती निवडणूक आ. कर्डिलेंना सोप्पी जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने चार आठवड्यात गट, गण, प्रभागांची रचना, आरक्षण याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. सप्टेंबरपर्यंत निवडणूक घेण्यास सांगितले. त्यामुळे जुन्या 73 गट व 146 गणांच्या रचनेप्रमाणे व फेरआरक्षणाप्रमाणे त्या होतात का, फक्त एवढेच पहावे लागणार आहे. दोन वर्षांपासून फेररचनेप्रमाणे कसे आरक्षण जाहीर झाले होते, ते आपण पाहू…

नगर तालुका जिल्हा परिषद गट आरक्षण असे

1.वडगाव गुप्ता गट- सर्वसाधारण महिला
2. जेऊर गट- सर्वसाधारण महिला
3. चिचोंडी पाटील गट- सर्वसाधारण महिला
4. नागरदेवळे गट- इतर मागासवर्ग महिला
5. नवनागापूर गट- अनुसूचित जाती महिला
6. दरेवाडी गट- सर्वसाधारण
7. वाळकी गट- सर्वसाधारण

नगर पंचायत समिती आरक्षण पुढीलप्रमाणे

1. देहरे गण- सर्वसाधारण
2. वडगाव गुप्ता गण- नागरिकांचा मागास प्रवर्ग
3. जेऊर गण- अनुसूचित जाती महिला
4. शेंडी गण- नागरिकांचा मागास प्रवर्ग
5. नागरदेवळे गण- सर्वसाधारण
6. बुऱ्हानगर गण- सर्वसाधारण महिला
7. केकती गण- सर्वसाधारण महिला
8. चिचोंडी पाटील गण- सर्वसाधारण
9. दरेवाडी गण- सर्वसाधारण महिला
10. अरणगाव गण- अनुसूचित जाती
11. नवनागापूर गण- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
12. नेप्ती गण- सर्वसाधारण
13. वाळकी गण- सर्वसाधारण महिला
14. गुंडेगाव गण- सर्वसाधारण

आता हे आरक्षण पाहीले तर आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत युवा नेते अक्षय कर्डिले यांना लाँन्च केले जाईल, असेही राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. कारण त्या आरक्षणानुसार वाळकी आणि दरेवाडी हे दोन्ही गट खुले झाले आहेत. गेल्या वेळी वडिलांच्या विधानसभेला महत्त्वाची भूमिका बजावणारे युवा नेते अक्षय कर्डिले हे दरेवाडीतून निवडणूक लढवतील, अशा शक्यता वाढल्या आहेत. यंदा जिल्हा परिषदेसाठी आ. कर्डिले आपल्या मुलाला लाँन्च करतील, असे काहींचे म्हणणे आहे. असे झाले तर, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक महायुती पूर्ण ताकदीने लढेल, असेही सांगितले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News