Onion Price Crash : पारनेर तालुक्यातील सुपा परिसरात कांदा हे शेतकऱ्यांसाठी नगदी पीक म्हणून ओळखले जाते. मात्र, यंदा कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. कांद्याच्या एका किलोसाठी सुमारे पाच रुपये उत्पादन खर्च येतो, परंतु सध्याच्या बाजारभावात हा खर्चही निघत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. जिरायत भागातील हे एकमेव नगदी पीक असून, त्याच्या भावात झालेली घसरण शेतकऱ्यांना अडचणीत आणत आहे.
मागील वर्षी कांद्याला चांगला भाव मिळाल्याने सुपा, मुंगशी, वाघुंडे, पळवे, जातेगाव, गटेवाडी, हंगा, रुईछत्रपती, वाळवणे, रायतळे, अस्तगाव, पिंपरी गवळी, रांजणगाव मशीद, आपधूप, शहाजापूर येथील शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली. परंतु, गतवर्षीप्रमाणे यंदाही चांगला भाव मिळेल, ही अपेक्षा पूर्ण झाली नाही. सध्या कांद्याला अत्यंत कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे कर्ज वाढत आहे, आणि त्यांची आर्थिक स्थिती बिकट होत चालली आहे.

कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो. एका एकरासाठी रोपे किंवा बियाणांवर ४ ते ५ हजार रुपये खर्च येतो, तर मजुरी आणि मशागतीसाठी ६ ते ७ हजार रुपये लागतात. याशिवाय खुरपणी, सेंद्रिय व रासायनिक खते, कीटकनाशके आणि पाण्याच्या पाळ्यांसाठी होणारा खर्च यामुळे एका किलोसाठी सरासरी ५ रुपये खर्च येतो. काढणीनंतर वाहतूक आणि बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्याचा खर्चही यात सामील होतो.
सध्याच्या बाजारात कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला आहे. मात्र, हवामानामुळे कांदा जास्त काळ टिकत नसल्याने त्यांना नाईलाजाने कमी भावात विक्री करावी लागत आहे, असे शेतकरी भगवान दळवी, सचिन चौधरी आणि जनार्धन दिवटे यांनी सांगितले. कांद्याऐवजी इतर पिके घेतली असती, तर अधिक फायदा झाला असता, अशी खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.
कांद्यासह इतर शेतमालाचे भावही घसरल्याने शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड कशी करावी, हा प्रश्न पडला आहे. शासनाने कांद्यासाठी हमीभाव जाहीर करावा आणि कर्जमाफीची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. या संकटातून बाहेर पडण्यासाठी शासकीय पाठबळाची त्यांना गरज आहे.