Tips to Save Power: आजकाल घरगुती वीज बिल सतत वाढत चालले आहे. उन्हाळ्यात एसी, पंखे आणि स्वयंपाकघरातील उपकरणांचा वापर वाढल्यामुळे खर्चही अधिक होतो. त्यामुळे वीज बचत करण्यासाठी योग्य पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे. काही घरगुती उपकरणे आणि चुकीच्या सवयीमुळे अनावश्यकपणे वीजेचा अधिक वापर होतो. या गोष्टींचा विचार करून वीज बिल कमी करता येते.
इन्व्हर्टर एसी
जर तुम्ही एसी वापरत असाल तर पारंपरिक एसीऐवजी इन्व्हर्टर एसीचा वापर करावा. इन्व्हर्टर एसी आपल्या खोलीच्या तापमानानुसार कंप्रेसरचा वेग बदलतो, ज्यामुळे वीजेचा वापर कमी होतो. तसेच, 5 स्टार रेटिंग असलेले इन्व्हर्टर एसी अधिक कार्यक्षम मानले जातात. त्यामुळे या प्रकारच्या एसीचा वापर केल्यास वीजेची बचत होऊ शकते.

पंखे बंद ठेवा-
पंख्याचा वापर करताना खूपदा लोक खोलीत नसतानाही पंखा चालू ठेवतात. यामुळे अनावश्यक वीज वापर होतो. त्यामुळे केवळ आवश्यक असताना पंखा चालवावा आणि त्याची नियमित साफसफाई, देखभाल करावी. यामुळे पंख्याचा मोटर नीट चालतो आणि वीजेचा वापर कमी होतो.
मायक्रोवेव्ह आणि ओव्हन
स्वयंपाकघरातील मायक्रोवेव्ह, टोस्टर, ओव्हन यासारखी उपकरणे स्टँडबाय मोडवर ठेवणे हीही मोठी वीज वाया जाण्याची कारणे आहेत. उपकरणे वापरल्यानंतर मुख्य स्विचवरून बंद करणे आवश्यक आहे. ती चालूच ठेवली तर ही उपकरणे सतत वीज खपवतात.
तसेच, टीव्ही, सेट टॉप बॉक्स, लॅपटॉप चार्जर यांसारखी उपकरणे वापरल्यानंतर स्टँडबाय मोडमध्ये राहतात आणि वीजेचा वापर सुरूच असतो. त्यामुळे अशा उपकरणांनाही मुख्य स्विचवर बंद करणे गरजेचे आहे. यामुळे वीजेची बचत होण्यास मदत होते.
या सोप्या पण प्रभावी उपायांचा अवलंब केल्यास घरातील वीज बिल लक्षणीयरीत्या कमी करता येऊ शकते. वीजेचा योग्य वापर आणि अनावश्यक उपकरणे बंद केल्यास आपण वीज बिल कमी करू शकतो.