Bonus Shares : शेअर बाजारात एक दिलासादायक बातमी आली जीटीव्ही इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीनं गुंतवणूकदारांना भरघोस बोनस आणि स्टॉक स्प्लिटचं गिफ्ट जाहीर केलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून झपाट्यानं वाढणाऱ्या या शेअरनं आज अधिकच लक्ष वेधून घेतलं. शेअर होल्ड करणाऱ्यांसाठी ही बातमी म्हणजे उत्सवच म्हणावा लागेल.
कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांना १ शेअरवर २ बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. म्हणजे जर तुमच्याकडे आधीपासूनच १० शेअर्स असतील, तर त्यावर तुम्हाला आणखी २० मोफत मिळतील. एवढ्यावरच थांबायचं नाही यासोबतच कंपनीनं स्टॉक स्प्लिटदेखील जाहीर केलं आहे. म्हणजे १० रुपये दर्शनी मूल्याचा प्रत्येक शेअर आता २ रुपयांच्या पाच भागांमध्ये विभागला जाईल. या निर्णयामुळे लहान गुंतवणूकदारांनाही या शेअरमध्ये भाग घेणं सोपं होईल, कारण एका शेअरची किंमत कमी होणार आहे.

अर्थात, बोनस आणि स्प्लिटच्या घोषणांमुळे बाजारात उत्साह आहेच, पण यामागे एक कारणही आहे — कंपनीची कामगिरी. गेल्या काही आठवड्यांत जीटीव्ही इंजिनिअरिंगनं चांगला वेग पकडला आहे. फक्त एका आठवड्यात या शेअरच्या किमतीत १० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, आणि गेल्या तीन महिन्यांतील परतावा तब्बल ४२ टक्क्यांचा आहे. २०२५ हे वर्ष तर या शेअरसाठी जबरदस्त ठरत आहे आतापर्यंतचा परतावा ९६ टक्क्यांहून अधिक आहे.
ज्यांनी हा शेअर गेल्या वर्षी घेतला होता, त्यांना आता जवळपास १३५ टक्क्यांचा नफा मिळालेला आहे. म्हणजे त्यांच्या गुंतवणुकीचं मूल्य दुप्पटहून अधिक झालं आहे. आज शुक्रवारी, या शेअरनं १.८९ टक्क्यांची वाढ घेत बीएसईवर १०३४.५५ रुपयांवर आपली दिवसअखेर केली. याच शेअरनं गेल्या पाच वर्षांत ४४४७ टक्क्यांची दमदार झेप घेतली आहे — ही आकडेवारी ऐकली की खरंच थक्क व्हायला होतं.
कंपनीचं ५२ आठवड्यांचं उच्चांकी मूल्य १०७० रुपये असून, सर्वात कमी पातळी ३९५ रुपयांपर्यंत गेली होती. आज कंपनीचं एकूण मार्केट कॅप सुमारे ३२३ कोटी रुपयांवर आहे. अजून रेकॉर्ड डेट जाहीर झालेली नसली, तरी अनेक गुंतवणूकदार या निर्णयावर लक्ष ठेवून आहेत.