महाराष्ट्र मेट्रोत नोकरीची जबरदस्त संधी, फक्त 100 रुपयांत अर्ज पगार 2.8 लाखांपर्यंत!

महाराष्ट्रातील तरुणांना आता मेट्रोत करिअर घडवण्याची मोठी संधी मिळतेय. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनं (MAHA-Metro) नुकतीच एक महत्त्वाची भरती प्रक्रिया सुरू केली असून, त्याअंतर्गत १५१ रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

कनिष्ठ अभियंता पदांपासून विविध तांत्रिक आणि आर्थिक विभागातील जबाबदाऱ्या या भरतीत समाविष्ट आहेत. त्यामुळे नोकरी शोधणाऱ्या अनेकांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता असावी लागेल.

वयोमर्यादा ५५ वर्षे

उदाहरणार्थ, काही पदांसाठी बी.आर्क, बीई किंवा बी.टेकची पदवी आवश्यक आहे, तर काही आर्थिक पदांकरिता सीए किंवा आयसीडब्ल्यूएची पात्रता मागितली गेली आहे. कमाल वयोमर्यादा ५५ वर्षे निश्चित करण्यात आली असली तरी मागासवर्गीय आणि अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना अनुक्रमे तीन आणि पाच वर्षांची सवलत मिळेल. ही सवलत पात्र उमेदवारांना नोकरीच्या शर्यतीत अधिक संधी मिळवून देते.

अर्ज प्रक्रिया

अर्ज प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन असून, इच्छुक उमेदवारांनी ४ जुलै २०२५ पूर्वी mahametro.org या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचा आहे. मात्र यानंतर, अर्जाची प्रिंट काढून त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून ती संबंधित कार्यालयात पाठवणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया थोडी पारंपरिक असली, तरी दस्तऐवज पडताळणीच्या दृष्टीने आवश्यक आहे.

वैयक्तिक मुलाखत

निवड प्रक्रियेचा मार्ग तसा स्पष्ट आहे. प्रथम उमेदवारांची वैयक्तिक मुलाखत होईल, त्यानंतर त्यांच्या शैक्षणिक आणि इतर कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. शेवटी वैद्यकीय चाचणी होईल आणि या सर्व टप्प्यांत यश मिळवणाऱ्यांनाच अंतिम नियुक्ती मिळणार आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, हे नक्की.

२,८०,००० रुपयांपर्यंत पगार

अर्जासाठी सामान्य व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ४०० रुपये शुल्क द्यावं लागेल, तर एससी, एसटी व महिला उमेदवारांसाठी हे शुल्क केवळ १०० रुपये आहे.निवड झालेल्या उमेदवारांना ४०,००० पासून ते थेट २,८०,००० रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो, जो नोकरीच्या स्थैर्यासोबतच उत्तम आर्थिक भवितव्यही दर्शवतो.

ऑफलाइन अर्ज

ऑफलाइन अर्ज योग्य पत्त्यावर पाठवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. नागपूर, नवी मुंबई, ठाणे आणि पुणे अशा विविध मेट्रो प्रकल्पांसाठी वेगवेगळे पत्ते दिले गेले आहेत. त्यामुळे अर्ज करणाऱ्यांनी योग्य पत्ता लक्षात घेऊन अर्ज सादर करावा. ह्या नोकरी संदर्भातील अधिक माहितीसाठी कृपया mahametro.org या अधिकृत संकेतस्थळावर व्हिझिट करा.