भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांच्या सोयीसाठी नेहमीच नवनवीन प्रयोग करत राहते. त्याचाच एक भाग म्हणून लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन रुळावर धावणार आहे, यामुळे प्रवास आता जलद आणि आरामदायक होणार आहे.
जुलै महिन्याच्या शेवटी वंदे भारत स्लीपर ट्रेन प्रत्यक्ष धावू शकते, रेल्वेच्या तज्ज्ञांनी आणि आरडीएसओच्या अधिकाऱ्यांनी या ट्रेनच्या तंत्रज्ञानाचा आणि वेगाचा संपूर्ण तपास केला आहे. त्यामुळे या नवीन ट्रेनला सुरक्षिततेसह हाय स्पीडने धावण्याची परवानगी मिळण्याच्या दृष्टीने मोठी तयारी झाली आहे. रेल्वे बोर्ड सध्या या ट्रेनसाठी मार्ग आणि भाडे निश्चित करण्याच्या प्रक्रियेत आहे, आणि अपेक्षा आहे की लवकरच पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या ट्रेनचे उद्घाटन होईल.

३० वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच-
भारतीय रेल्वे पुढील आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये एकूण ३० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरु करण्याचा विचार करत आहे. सध्या बेंगळूरूमधील बीईएमएल कंपनीत १० ट्रेन तयार करण्यात आल्या आहेत, तर चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीत (आयसीएफ) ८ ते १० ट्रेन विकसित केल्या जात आहेत. या दोन्ही ठिकाणी ट्रेनचे डबे तयार होण्याचे काम जोमात सुरू आहे आणि हळूहळू या गाड्या ट्रॅकवर आणल्या जातील.
वंदे भारत स्लीपर ट्रेनची वैशिष्ट्ये-
वंदे भारत स्लीपर ट्रेनची रचना अशा प्रकारे केली आहे की ती १६० ते २४० किमी प्रतितास वेगाने धावू शकेल. सध्याच्या राजधानी, शताब्दी आणि वंदे भारत ट्रेनच्या तुलनेत या नव्या ट्रेनचा वेग अधिक असल्याने प्रवास वेळेत मोठी बचत होईल. सुरुवातीला या ट्रेनला १६० किमी प्रतितास वेगाने चालवले जाण्याचे नियोजन आहे आणि नंतर हळूहळू वेग वाढवला जाईल.
या गाड्यांमध्ये प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा दिल्या जातील ज्यामुळे प्रवास अधिक आरामदायक आणि सुखद होईल. या ट्रेनचे मार्ग विशेषतः दिल्ली-हावडा आणि दिल्ली-मुंबई सारख्या महत्वाच्या रस्त्यांवर ठेवले जातील, ज्यामुळे या भागातील प्रवाशांना जलद आणि आरामदायक प्रवासाचा लाभ मिळेल.