बॉलिवूडची सौंदर्यवती आणि जागतिक स्तरावर आपल्या अभिनयाची छाप पाडणारी ऐश्वर्या राय बच्चन हिच्याबाबतची एक रोचक गोष्ट समोर आली आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की बॉक्स ऑफिसवर तब्बल 4,112 कोटी रुपयांची कमाई करणारा एक हॉलिवूड चित्रपट ऐश्वर्याने नाकारला होता. हा निर्णय तिने का घेतला आणि त्या चित्रपटाचं पुढे काय झालं, हे जाणून घेतल्यावर तुम्हालाही धक्का बसेल.

ऐश्वर्या राय बच्चन हिने केवळ भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपली ओळख निर्माण केली आहे. मिस वर्ल्डचा किताब जिंकून पुढे तिने अभिनय क्षेत्रात आपली छाप सोडली. पण ऐश्वर्याने काही प्रोजेक्ट्स नाकारले, जे पुढे सुपरहिट ठरले. त्यापैकीच एक होता 2005 मध्ये आलेला हॉलिवूड चित्रपट Mr. & Mrs. Smith.
ब्रॅड पिट सोबतचा चित्रपट-
या चित्रपटात ब्रॅड पिट मुख्य भूमिकेत होता आणि ऐश्वर्याला त्याच्या पत्नीची भूमिका म्हणजेच ‘जेन स्मिथ’ साठी विचारण्यात आलं होतं. पण ऐश्वर्याने हा चित्रपट नाकारला. एका मुलाखतीत बोलताना तिने सांगितलं की, या चित्रपटासाठी निर्मात्यांना तब्बल 6 ते 9 महिन्यांचा वेळ हवा होता. त्या काळात तिच्याकडे भारतातील काही महत्त्वाचे प्रोजेक्ट्स होते. आपल्याकडील जबाबदाऱ्या सोडून हॉलिवूडसाठी इतका वेळ देणं तिला शक्य नव्हतं, म्हणून तिने हा प्रोजेक्ट न करण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर ही भूमिका अॅंजोलिना जोलीला मिळाली आणि या चित्रपटाने जगभरात गाजावाजा केला. ब्रॅड पिट आणि अॅंजोलिनाच्या जोडीची केमिस्ट्री, अॅक्शन आणि रोमँसने प्रेक्षकांना भुरळ घातली. या चित्रपटाने जागतिक पातळीवर 4,112 कोटी रुपयांची कमाई केली आणि अॅंजोलिनाला एक वेगळी ओळख मिळवून दिली.
Troy चित्रपटही नाकारला-
हेच नव्हे तर, ऐश्वर्याने याआधी Troy सारखा आणखी एक मोठा हॉलिवूड चित्रपटही नाकारला होता. या निर्णयामागेही तारखा आणि इतर कमिटमेंट्स हेच कारण होतं. तिच्या मते, आधीचे प्रोजेक्ट्स अर्धवट सोडणे योग्य ठरणार नव्हते आणि म्हणूनच तिने हे मोठे प्रोजेक्ट्स टाळले.
यामुळे तिचा हॉलिवूडचा प्रवास थांबलेला नाही. तिने Bride & Prejudice, The Mistress of Spices, Provoked आणि The Pink Panther 2 यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करून आपली जागतिक उपस्थिती टिकवून ठेवली. IMDb वरही तिच्या कामगिरीला 6.5/10 रेटिंग मिळाले आहे.