बनावट ॲपद्वारे शनिभक्तांची कोट्यावधींची फसवणूक, मंदिर प्रशासन आरोपींना पाठिशी घालत असल्याचा आरोप करत काँग्रेसचे आंदोलन

शनिशिंगणापूर येथे बनावट ॲपद्वारे झालेल्या देणगी गैरप्रकाराच्या चौकशीसाठी काँग्रेस व संघटनांनी देवस्थान परिसरात धरणे आंदोलन केले. प्रशासनाची माहिती लपवण्याची भूमिका आणि संथ कारवाईविरोधात तीव्र निषेध नोंदवण्यात आला.

Published on -

Ahilyanagar News:  सोनई- श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील बनावट ॲपची तातडीने चौकशी करून कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस व विविध संघटनाकडून काल सोमवारी शिंगणापूर देवस्थान मंदिर परिसरात धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी शनिशिंगणापूरमध्ये काहींनी देवस्थानच्या अधिकृत ॲपच्या ऐवजी बनावट ॲप तयार करून ऑनलाइन पूजेच्या माध्यमातून तसेच बनावट देणगी पावती व बनावट ॲपच्या माध्यमातून गैरप्रकार करून हा निधी आपल्या खाजगी खात्यावर वळून घेतल्याचा आरोप करण्यात आला. त्यात देवस्थानची व देशभरातील शनिभक्तांची मोठी लूट झाली आहे. 

काँग्रेसने केली चौकशीची मागणी

त्याविरोधात काँग्रेसचे संभाजी माळवदे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक व धर्मदाय उपायुक्त यांची भेट घेऊन चौकशीची मागणी देखील केली आहे. तर देवस्थान प्रशासनाकडे त्यांनी परवानगी दिलेल्या ॲपबद्दल माहिती मागण्यात आली होती. यामध्ये धर्मदाय आयुक्त यांचे परवानगी पत्र, ट्रस्टचा ठराव, करारनामा, अशी माहिती मागण्यात आली होती. 

देवस्थान प्रशासनाकडून माहिती देण्यास टाळाटाळ

देवस्थान प्रशासनाने ही माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने व गैरप्रकार करणाऱ्यांना पाठीशी घातल्याने इतर ॲपची माहिती दाबण्याचा प्रयत्न केल्याने काल सोमवारी देवस्थान आवारात काँग्रेस व विविध संघटनाकडून भर उन्हामध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.

कारवाई होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही

या प्रकरणी तीव्र गतीने तपास करण्याची मागणी आंदोलकांनी केली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे संभाजी माळवदे यांनी देवस्थान प्रशासनाने फक्त तीन ॲपवर कारवाईची मागणी करून इतर बनावट पावती पुस्तक चालकांना पाठीशी घालणे दुर्दैवी गोष्ट आहे. पूर्ण कारवाई होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे स्पष्ट केले. 

भाविकांच्या श्रद्धेवर घाला

शेतकरी संघटनेचे अशोकराव काळे यांनी आरोप करीत भाविकांच्या श्रद्धेला यांनी गंडा घातल्याचा आरोप केला. हरीश चक्रनारायण यांनी देवस्थान आता सरकार जमा करण्याची वेळ आली असून प्रशासकाची गरज आहे. त्याशिवाय हा प्रकार दूर होऊन कारभार सुरळीत होणार नसल्याचे सांगितले. तसेच काँग्रेसचे शहराध्यक्ष अंजुम पटेल, महिला अध्यक्ष शोभा पातारे, स्वाभिमानी संघाचे गणपत मोरे, बहुजन वचितचे विजयसिंह गायकवाड, संजय वाघमारे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. तर या आंदोलनात संजय होडगर, कानिफ जगताप, सुमित पटारे, संदिप मोटे, सतीश तन्हाळ, गोरक्षनाथ काळे आदीसह शनिभक्त सहभागी झाले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe