Suzlon Energy Share Price:- आजच्या शेअर बाजारात एक वेध घेण्यासारखी बाब म्हणजे सुझलॉन एनर्जी या कंपन्याच्या शेअर्सबाबत गुंतवणूकदारांच्या अपेक्षांमध्ये थोडा बदल झालेला दिसतो. सध्या बाजार चढ-उताराच्या टप्प्यावर आहे आणि अशा वेळी एखाद्या मोठ्या ब्रोकरेज संस्थेने एखाद्या कंपनीबाबत मत बदलले, की त्याचे पडसाद लगेच दिसून येतात. आज तसंच काहीसं घडलं.जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसने सुझलॉनबाबत थोडीशी सावध भूमिका घेतली आहे.
सुझलॉन एनर्जीवर तज्ञांचा सल्ला काय?
सुझलॉन एनर्जीवर ‘खरेदी करा’ हे रेटिंग पूर्वीपासून होतं. मात्र आता हेच रेटिंग जिओजितने ‘साठवा’ (Accumulate) या टप्प्यावर आणलं आहे. म्हणजे कंपनीत अजूनही काही संधी आहेत, पण जोमाने खरेदी करायची वेळ थोडी मागे टाकलेली आहे. याचसोबत, या ब्रोकरेज हाऊसने सुझलॉनसाठी दिलेली लक्ष्य किंमत ७७ रुपयांवरून थेट ७१ रुपयांवर आणली आहे. म्हणजे साधारण ६ रुपयांनी अंदाज कमी केला आहे. याच दिवशी कंपनीचे शेअर्स BSE वर १.४२ टक्क्यांनी घसरले आणि ६४.७४ रुपयांवर बंद झाले.

या मूल्यांकनामागची मुख्य चिंता म्हणजे सुझलॉनच्या मोठ्या प्रकल्पांची अंमलबजावणी. जिओजितला वाटतं की या प्रकल्पांच्या अंमलबजावणीत काही अडथळे येऊ शकतात आणि त्यामुळे पुढील काही तिमाहींसाठी वाढीचा वेग थोडा मंदावू शकतो. हे बोलताना ते कंपनीच्या सध्याच्या आर्थिक स्थितीबाबत मात्र सकारात्मकच आहेत. कारण मार्च २०२५ च्या तिमाहीत सुझलॉनने जबरदस्त कामगिरी केली आहे. निव्वळ नफ्याच्या आकड्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधलं. तब्बल ११८१ कोटी रुपयांचा नफा नोंदवला गेला.
कंपनीच्या शेअरच्या हालचाली पाहिल्या तर सप्टेंबर २०२४ मध्ये शेअर ८६ रुपयांपर्यंत पोहोचले होते, जे त्याचं ५२ आठवड्यांचं उच्चांकी मूल्य आहे. त्याच वेळी ४६ रुपयांची नीचांकी पातळीही याच वर्षात अनुभवली आहे. मे महिन्यात शेअरने २७ टक्क्यांची भरघोस झेप घेतली होती, पण जूनमध्ये मात्र सुमारे १० टक्क्यांनी गमावले. यापूर्वी फेब्रुवारीमध्येही शेअरने १४ टक्क्यांची मजल मारली होती.