Sun Pharma Share:- आज शेअर बाजारात औषध क्षेत्राकडून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सन फार्मास्युटिकल्स या देशातील आघाडीच्या औषधनिर्माता कंपनीच्या हालोल युनिटविषयी यूएस एफडीएकडून (अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासन) काही गंभीर निरीक्षणं नोंदवण्यात आली आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या दृष्टीने ही एक लक्षवेधी घडामोड ठरली आहे.
गुजरातमधील हालोल येथील सन फार्माचं उत्पादन केंद्र हे कंपनीचं एक मोठं आणि महत्त्वाचं युनिट मानलं जातं. याच प्लांटची यंदा जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात म्हणजे २ जून ते १३ जूनदरम्यान यूएस एफडीएकडून तपासणी करण्यात आली. या तपासणीनंतर अमेरिकन नियामक संस्थेने प्लांटविषयी तब्बल आठ आक्षेप नोंदवले असून, फॉर्म ४८३ नावाचं एक अधिकृत दस्तऐवजही कंपनीला दिलं आहे. या फॉर्ममध्ये काही प्रक्रियात्मक त्रुटी आणि दस्तऐवजांच्या व्यवस्थापनासंबंधी सुधारणा करण्याची गरज असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

2022 मध्ये ही झाली होती युनिटची तपासणी
हे पहिल्यांदाच घडलेलं नाही. याआधी मे २०२२ मध्ये देखील याच युनिटची तपासणी करण्यात आली होती आणि त्यानंतर यूएस एफडीएकडून एक चेतावणी पत्रही जारी करण्यात आलं होतं. त्यानंतर हालोल युनिटवर अमेरिकेतून उत्पादनांच्या आयातीवर बंधन आलं होतं. त्यामुळे अमेरिकन बाजारात उत्पादनांची विक्री ठप्प झाली होती. हीच परिस्थिती पुन्हा उद्भवण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
कंपनीकडून मात्र आश्वासक पावलं उचलली जात आहेत. सन फार्माने स्पष्ट केलं आहे की, त्यांनी आक्षेपांची गंभीर दखल घेतली असून, यूएस एफडीएने व्यक्त केलेल्या सर्व चिंता दूर करण्यासाठी आवश्यक ती प्रत्येक सुधारणा केली जाईल. नियामकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत, असं कंपनीचं म्हणणं आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी, १३ जून रोजी शेअर बाजारात सन फार्माचा शेअर सौम्य वाढीसह १६८७.८० रुपयांवर बंद झाला. दिवसाअखेर ०.०२ टक्क्यांची म्हणजे ०.४० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १९६०.३३ रुपये असून, नीचांक १४६०.९० रुपयांवर आहे.