वडील-मुलगी यांचे नाते अनमोल असते. बॉलिवूडने अनेकदा हे नाते विविध रूपांतून दाखवले असून, काही चित्रपट तर अगदी काळजाला भिडणारे ठरले आहेत. यावसरी 15 जून म्हणजेच या रविवारी फादर्स डे साजरा केला जाणार आहे. याच निमित्ताने तुम्हाला अशा काही चित्रपटांची आठवण करून देतो आहोत जे वडील आणि मुलीमधील अतूट प्रेम, त्याग आणि समर्पणाचा सुंदर प्रवास उलगडतात. या चित्रपटांमध्ये काही नावं अशी आहेत जी केवळ अभिनयासाठी नाही, तर त्यांच्या भावनिक कथानकासाठी कायम लक्षात राहतील. विशेष म्हणजे, अभिषेक बच्चनच्या दोन भावस्पर्शी चित्रपटांचाही यात समावेश आहे.
पीकू (2015)

अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण यांच्या भूमिकेतील पीकू हा चित्रपट वडील आणि मुलीच्या नात्याच्या सूक्ष्म पैलूंना हात घालतो. एका वृद्ध, हट्टी वडिलांची जबाबदारी सांभाळणारी मुलगी, तिची स्वतःची ओळख, करिअर आणि प्रेमाचे टोकदार क्षण हे सगळं फारच वास्तवदर्शीपणे दाखवण्यात आलं आहे.
दंगल (2016)
आमिर खान, सना फातिमा शेख आणि सान्या मल्होत्रा यांच्या या सुपरहिट चित्रपटात एक बाप आपल्या मुलींना रेसलिंग चॅम्पियन बनवण्यासाठी झटतो. मुलगी-मुलगा असा भेदभाव न करता दिलेलं स्वप्न आणि त्या वाटेवरचा संघर्ष इथे कमालीचा भिडतो.
बी हॅप्पी (2023)
अभिषेक बच्चन आणि इनायत वर्मा यांचा ‘Be Happy’ हा डान्स-ड्रामा चित्रपट एक सिंगल फादर आणि त्याच्या मुलीची कहाणी मांडतो. मुलीच्या नृत्य स्वप्नासाठी धडपडणाऱ्या एका बापाची ही प्रेरणादायी कथा आहे.
आय वॉन्ट टू टॉक (2024)
अभिषेक बच्चनचा आणखी एक चित्रपट ‘I Want To Talk’ यामध्येही वडील-मुलीचे हळवे संबंध दाखवण्यात आले आहेत. मुलीच्या व्यक्तिमत्त्व विकासात वडिलांची भूमिका किती महत्वाची असते, हे या चित्रपटात ठळकपणे दिसते.
थप्पड (2020)
तापसी पन्नूचा ‘Thappad’ मुख्यतः एका सामाजिक मुद्द्यावर आधारित आहे, परंतु या चित्रपटात वडिलांच्या रूपातील आदर्श व्यक्तीमत्व दाखवले गेले आहे. एक वडील आपल्या मुलीला स्वाभिमानाचा अर्थ समजावतात.
भूमी (2017)
संजय दत्त आणि अदिती राव हैदरी यांचा ‘Bhoomi’ हा थरारक आणि भावनिक चित्रपट एका वडिलांच्या मुलीसाठी घेतलेल्या लढ्याची कथा आहे.
अंग्रेजी मीडियम (2020)
इरफान खान आणि राधिका मदन यांचा ‘Angrezi Medium’ हा चित्रपट एका बापाने आपल्या मुलीच्या स्वप्नासाठी घेतलेली धडपड अतिशय भावुकतेने सादर करतो. परदेशी शिक्षणासाठी झगडणाऱ्या एका सामान्य वडिलांची कथा प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करते.