World’s Richest People:- आजच्या घडामोडीत जगातील अब्जाधीशांच्या यादीत मोठा फेरफार झालाय. ओरेकल कंपनीचे सह-संस्थापक आणि अध्यक्ष लॅरी एलिसन यांनी तब्बल दोन दिग्गज फेसबुकचे झुकरबर्ग आणि अमेझॉनचे बेझोस यांना संपत्तीच्या शर्यतीत मागे टाकलं आहे. एलिसन आता जगातल्या दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. फोर्ब्सच्या ताज्या आकडेवारीनुसार, त्यांची एकूण संपत्ती २५८.८ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. या यादीत त्यांच्यापुढे फक्त एलोन मस्क आहेत.
या बदलामागील मुख्य कारण काय?
या बदलामागचं मुख्य कारण म्हणजे ओरेकलच्या शेअर्समध्ये झालेली जोरदार वाढ. १२ जून रोजी कंपनीचे शेअर्स थेट १३ टक्क्यांनी उंचावले. एका दिवसातच एलिसन यांची संपत्ती तब्बल २६ अब्ज डॉलर्सने वाढली. याच एका उडीने त्यांनी दुसऱ्या क्रमांकाचं स्थान मिळवलं. मागील दोन महिन्यांत ओरेकलच्या एआय आणि क्लाउड सेवा क्षेत्रातील आक्रमक वाढीमुळे त्यांची संपत्ती ६६ अब्ज डॉलर्सने वाढली आहे.

मार्क झुकरबर्ग आणि जेफ बेझोस यांनी मागे सरकावं लागलंय. झुकरबर्ग सध्या २३५.७ अब्ज डॉलर्ससह तिसऱ्या स्थानी आहेत, तर बेझोस २२६.८ अब्ज डॉलर्ससह चौथ्या स्थानी. हे दोघंही अलिकडच्या काही आठवड्यांत या क्रमांकावर स्थिर नव्हते. शेअर बाजारातील चढ-उतारांमुळे ही यादी सतत बदलत आहे.
लॅरी एलिसन यांची कहानी काय?
लॅरी एलिसन यांची कहाणीही तितकीच लक्षवेधी आहे. न्यू यॉर्कमध्ये जन्मलेल्या एलिसन यांना त्यांची जन्मदाती आई लहानपणीच दत्तक देण्यास नकार देऊन बाजूला झाली. नातेवाइकांच्या घरात शिकागोमध्ये त्यांचं पालनपोषण झालं. कॉलेजचं शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी संगणक प्रोग्रामिंग शिकलं आणि तिथूनच त्यांच्या आयुष्याची दिशा बदलली. पदवी पूर्ण न करता त्यांनी सॉफ्टवेअर क्षेत्रात पाय रोवले आणि ‘पदवी नसलेला अब्जाधीश’ अशी ओळख निर्माण केली.
१९७७ मध्ये दोन भागीदारांसह त्यांनी ओरेकलची स्थापना केली. आज ही कंपनी जगातील आघाडीची डेटाबेस सॉफ्टवेअर कंपनी म्हणून ओळखली जाते. सन मायक्रोसिस्टम्ससारख्या कंपन्यांचं अधिग्रहण करून आणि अमेरिकन सरकारच्या महत्त्वाच्या तंत्रज्ञान प्रकल्पांमध्ये भाग घेऊन, ओरेकलने स्वतःची ताकद प्रचंड वाढवली आहे. एलिसन अजूनही कंपनीत ४२.९ टक्के हिस्सा बाळगतात आणि तंत्रज्ञानाच्या निर्णयांमध्ये त्यांची प्रमुख भूमिका असते.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स मात्र या शर्यतीत मागे पडले आहेत. सध्या ते ११६.५ अब्ज डॉलर्स संपत्तीसह १२व्या स्थानी पोहोचले आहेत. त्यांच्या जागी एनव्हिडियाचे जेन्सेन हुआंग यांनी टॉप-१० मध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या नावाजलेल्या चिप तंत्रज्ञानामुळे ते १२३.९ अब्ज डॉलर्ससह १०व्या स्थानी पोहोचले आहेत.