Hyundai Share Price:- आजच्या बाजारात गुंतवणूकदारांचा प्रमुख कल ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडच्या शेअर्सकडे वळलेला दिसून आला. आठवड्याच्या सुरुवातीलाच या कंपनीच्या शेअरने चांगली उसळी घेतली आणि गुंतवणूकदारांच्या अपेक्षांना बळ दिलं. सकाळी बाजार उघडताच ह्युंदाईचा शेअर १९४६ रुपयांवर सुरु झाला आणि दिवसभरात तो चक्क १९८२ रुपयांपर्यंत पोहोचला. म्हणजेच ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीला तो आज पोहोचला.
या वाढीमागील प्रमुख कारण काय?
या वाढीचं मुख्य कारण म्हणजे प्रसिद्ध विदेशी गुंतवणूक बँक यूबीएसने ह्युंदाईच्या शेअरसाठी दिलेला आशावादी अंदाज. त्यांनी या स्टॉकसाठी २३५० रुपयांची लक्ष्य किंमत जाहीर केली असून, ही किंमत मागील बंद भावाच्या तुलनेत सुमारे २१ टक्क्यांनी जास्त आहे. यूबीएसचं म्हणणं आहे की, येत्या काही आर्थिक वर्षांमध्ये म्हणजे २०२६ ते २०२८ या दरम्यान कंपनीच्या देशांतर्गत विक्रीत दरवर्षी सरासरी १० टक्क्यांची वाढ होऊ शकते. तुलनात्मकदृष्ट्या, २०१९ ते २०२५ दरम्यान ही वाढ फक्त २ टक्क्यांवर होती.

सीएनबीसी टीव्ही १८ने दिलेल्या माहितीनुसार, या स्टॉकचं विश्लेषण करणाऱ्या २४ विश्लेषकांपैकी तब्बल २० जणांनी ‘खरेदी करा’ असा सल्ला दिला आहे. एकाने ‘होल्ड’चा पर्याय निवडला असून, केवळ तीन तज्ञांनी विक्रीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे या शेअरबाबत बाजारात एकूण सकारात्मक वातावरण तयार झालं आहे.
गेल्या वर्षी आला होता ह्युंदाई मोटरचा IPO
ह्युंदाई मोटरचा IPO देखील चर्चेचा विषय राहिला होता. गेल्या वर्षी १५ ते १७ ऑक्टोबरदरम्यान उघडलेला हा IPO बाजारातील सर्वात मोठ्यांपैकी एक ठरला. त्यावेळी तो २.३७ वेळा ओव्हरसबस्क्राइब झाला होता. आजच्या व्यवहारात या शेअरने IPO इश्यू किंमत म्हणजेच १९६० रुपयांची पातळीही पार केली, ज्यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास अधिकच वाढलेला दिसतोय.