Tata Motors Shares Fall:- आजच्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात टाटा मोटर्सने घसरणीचा सूर पकडला आणि गुंतवणूकदारांची चिंता वाढली. सकाळीच बाजार उघडताच कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण झाली आणि दिवसभरात त्यांची किंमत ५ टक्क्यांहून अधिक गडगडत ६७२ रुपयांच्या आसपास स्थिरावली. या घसरणीचा थेट संबंध कंपनीच्या परदेशातील उपकंपनी जेएलआरने जाहीर केलेल्या आर्थिक अंदाजाशी आहे.
टाटा मोटर्सची ही उपकंपनी जग्वार लँड रोव्हर युनायटेड किंगडममध्ये कार्यरत असून ती कंपनीच्या एकूण उत्पन्नाचा मोठा हिस्सा निर्माण करते. मात्र, यंदाच्या आर्थिक वर्षासाठी कंपनीने जो अंदाज व्यक्त केला आहे, तो गुंतवणूकदारांच्या अपेक्षांना झेपेचा वाटला नाही. जेएलआरने सांगितलं की पुढील काही तिमाहीत त्यांचे नफा-अनुपात म्हणजेच EBIT मार्जिन केवळ ५ ते ७ टक्क्यांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे, जो मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. मागील आर्थिक वर्षात त्यांचं मार्जिन ८.५ टक्के होतं, त्यामुळे ही घसरण गुंतवणूकदारांच्या नजरेत आली.

यासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोख प्रवाह म्हणजे कंपनीच्या हाती उरणारे पैसे. गेल्या वर्षी जेएलआरच्या हाती १.५ अब्ज पौंड इतका रोख उरला होता, पण यंदा तो ‘शून्याच्या आसपास’ राहू शकतो, असं कंपनीने स्पष्ट केलं. ही बाब कंपनीच्या भविष्यातील गुंतवणुकीच्या क्षमतेवर आणि तिच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह उभं करते.
यावर कंपनीचे म्हणणे काय?
तरीसुद्धा कंपनीचं म्हणणं आहे की २०२७ आणि २०२८ या पुढील आर्थिक वर्षांमध्ये ते पुन्हा एकदा १० टक्क्यांपर्यंत EBIT मार्जिन गाठण्याचा प्रयत्न करणार आहेत. पण हे लक्ष गाठण्यासाठी वेळेचं कोणतंही निश्चित संकेत त्यांनी दिलं नाही, त्यामुळे गुंतवणूकदारांचा गोंधळ आणखी वाढला आहे.
जेएलआरची कामगिरी टाटा मोटर्ससाठी महत्त्वाची का?
टाटा मोटर्ससाठी जेएलआरची कामगिरी इतकी महत्त्वाची का आहे, हे लक्षात घ्यायला हवं. एकट्या २०२५ या आर्थिक वर्षात जेएलआरने टाटा मोटर्सच्या एकूण महसुलात ७१ टक्के आणि नफ्यात तब्बल ८० टक्क्यांहून अधिक वाटा दिला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणावर परिणाम करणाऱ्या उपकंपनीच्या भविष्यकाळाबद्दल अनिश्चितता निर्माण झाली तर मुख्य कंपनीवर त्याचे पडसाद येणं स्वाभाविकच आहे.
तरीही, कंपनीने हेही सांगितलं आहे की, जेएलआरने premium car सेगमेंटमध्ये आपलं स्थान कायम ठेवलं असून, मे महिन्यात त्यांनी बाजारपेठेच्या सरासरीपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. म्हणजे, बाजारातील स्पर्धा आणि उलथापालथ असूनही ब्रँडची पकड मजबूत राहिली आहे.
ताज्या आकड्यांवरून पाहता, टाटा मोटर्सचे शेअर्स सध्या त्यांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी म्हणजेच ११७९ रुपयांपासून बरेच खाली घसरले असून, सध्या किंमत ६७० रुपयांच्या घरात आहे. गुंतवणूकदारांच्या दृष्टीने ही मोठी घसरण असली, तरी काहींच्या मते हे नवीन संधीचं दारही उघडू शकते. पण त्यासाठी जेएलआरचा आगामी प्रवास अधिक स्पष्ट होणं गरजेचं आहे.