IHCL Stock Target:- आज शेअर बाजारात टाटा समूहाच्या एका महत्वाच्या कंपनीने पुन्हा एकदा गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतलं. इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड ही टाटांची हॉटेल क्षेत्रातील प्रमुख कंपनी असून तिच्या शेअर किमतीत चांगलीच उसळी घेताना दिसली. सोमवारी सकाळीच या कंपनीचे शेअर्स तब्बल २ टक्क्यांहून अधिक वाढून ७५४ रुपये या पातळीवर पोहोचले. बाजारात असा अंदाज आहे की या शेअरमध्ये अजूनही जोरदार वाढ होऊ शकते.
जेफरीजने वर्तवला महत्त्वाचा अंदाज
परदेशी ब्रोकरेज कंपनी जेफरीजने यावर मोठं विधान केलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की, इंडियन हॉटेल्सचे शेअर्स पुढे जाऊन थेट ९८० रुपयांपर्यंत जाऊ शकतात. म्हणजेच, आत्ताच्या भावाच्या तुलनेत जवळपास ३० टक्क्यांहून जास्त वाढीची शक्यता आहे. हे एक साधं भाकीत नाही, तर त्यांनी यामागे कंपनीच्या भविष्यातील योजना, मागणी-पुरवठ्याचे गणित आणि व्यवस्थापनाच्या आशावादी दृष्टिकोनाचा विचार केला आहे.

कंपनीने यंदाच्या आर्थिक वर्षात दुहेरी अंकात महसूल वाढीचं लक्ष्य ठेवलं आहे आणि २०३० पर्यंत आपल्या हॉटेल पोर्टफोलिओसोबतच एकत्रित महसूल दुप्पट करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. हा आत्मविश्वास त्यांच्या धोरणात्मक योजना, ब्रँड विस्तार, आणि बाजारातील स्थिरतेवर आधारित आहे. बाजारात मागणी वाढते आहे, हॉटेल क्षेत्रात स्थिरता परत आली आहे, आणि याचा फायदा IHCL ला स्पष्टपणे होत आहे.
या अगोदर दिलाय गुंतवणूकदारांना चांगला परतावा
याआधीही या शेअरने गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला आहे. मागच्या पाच वर्षांत इंडियन हॉटेल्सच्या शेअरने तब्बल ८३० टक्क्यांहून अधिक वाढ घेतली आहे. २०२० मध्ये फक्त ८० रुपयांच्या आसपास असलेला शेअर आज ७५० रुपयांवर पोहोचला आहे. केवळ तिन्ही वर्षांतच २५० टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली. यावरून कंपनीच्या कामगिरीचा आणि बाजारातील विश्वासाचा अंदाज यायला हरकत नाही.
यंदाच्या वर्षात या शेअरची सर्वाधिक पातळी ८९४ रुपये राहिलेली आहे, तर नीचांकी पातळी ५७१ रुपये इतकी होती. त्यामुळे जर कंपनीची कामगिरी अशीच टिकून राहिली आणि बाजाराने तिच्यावर असलेला विश्वास कायम ठेवला, तर पुढील काही महिन्यांत हे लक्ष्य म्हणजे ९८० रुपये, काही अतीशयोक्ती वाटणार नाही. शेअर बाजारात जोखीम असतेच, पण काही शेअर्स आपल्या कामगिरीने ती जोखीम थोडी कमी करतात. इंडियन हॉटेल्स त्यापैकीच एक असल्याचं सध्या तरी स्पष्टपणे दिसतं आहे.