आपण अनेकदा गाड्यांच्या मागच्या काचेवर काही बारीक रेषा पाहतो. कुणाला वाटतं त्या केवळ डिझाइनसाठी असतात, तर कुणाला त्यांचा काही उपयोगही नसतो असं वाटतं. पण सत्य खूप वेगळं आणि महत्त्वाचं आहे. ही रेषा म्हणजे एक अत्यंत उपयुक्त तंत्रज्ञानाचं लपलेलं रूप आहे, ज्यामुळे तुमचं ड्रायव्हिंग सुरक्षित आणि सुलभ होतं. विशेषतः धुके किंवा पावसाच्या दिवसात.

या रेषांना ‘डिफॉगर लाईन्स’ किंवा ‘रिअर डिफॉगर’ म्हणतात. त्या धातूच्या अत्यंत सूक्ष्म पट्ट्यांपासून बनवलेल्या असतात आणि त्या गाडीच्या मागील काचेला आतून लावलेल्या असतात. या रेषा डिझाइन नाहीत, तर त्यांचा एक अत्यंत उपयोगी हेतू असतो. काच धुकेमुक्त ठेवणे. जेव्हा हवामान थंड असतं, किंवा पावसाळ्यात आर्द्रतेमुळे काच धूसर होते, तेव्हा ही डिफॉगर लाईन्स कामाला लागतात आणि मागचा व्ह्यू पूर्णपणे स्पष्ट करून देतात.
डिफॉगर लाईन्स
डिफॉगर लाईन्स एक विशिष्ट प्रकारची उष्णता निर्माण करतात. गाडीचा चालक जेव्हा डॅशबोर्डवरील एक छोटं बटण दाबतो, तेव्हा विजेचा प्रवाह या रेषांमधून वाहू लागतो. या प्रवाहामुळे त्या हलक्या गरम होतात आणि त्यामुळे काचेला बसलेला ओलावा किंवा गोठलेले पाणी हळूहळू नाहीसं होतं. याचा थेट फायदा असा की, मागचा रस्ता चालकाला स्पष्टपणे दिसतो आणि कोणताही अपघात टाळण्यास मदत होते.
गाडीच्या समोरील काचेसाठी, वेगळी प्रणाली वापरली जाते. एसी सिस्टममधून गरम हवा व्हेंट्समधून बाहेर येते. पण मागच्या काचेवर हे शक्य नसतं. त्यामुळे तेथे ही डिफॉगर लाईन्स वापरण्यात येतात. दोन्हीची भूमिका एकच, चालकाला समोर आणि मागे नीट दिसण्यास मदत करणे.
डिफॉगर लाईन्सचे फायदे
या रेषा अत्यंत नाजूक असतात. त्यामुळे कार धुताना किंवा काच पुसताना त्यावर अतिरिक्त दाब येणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागते. जर या रेषा तुटल्या, तर त्या दुरुस्त करणे फारसे सोपे नसते. अनेक वेळा संपूर्ण काचच बदलावी लागते. त्यामुळे त्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष होऊ नये.
आज बहुतांश कारमध्ये हे डिफॉगरचे फीचर स्टँडर्ड स्वरूपात दिलं जातं. विशेषतः मध्यम व उच्च श्रेणीच्या मॉडेल्समध्ये. हे एक छोटंसं पण अत्यंत जीवनावश्यक फिचर आहे. तुम्ही पावसात, थंडीत किंवा सकाळी ऑफिसला जाताना गाडी चालवत असाल आणि अचानक मागचा रस्ता धुक्यामुळे दिसेनासा झाला, तर फक्त एक बटण दाबा आणि तुमचं दृश्य परत स्पष्ट होईल.