Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. रेल्वे कडून एक नव्या विशेष एक्सप्रेस ट्रेन ची घोषणा करण्यात आली आहे. पुढील महिन्यात म्हणजे जुलै महिन्यात ही नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेद्वारे विशेष रेल्वेसेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे विशेष एक्सप्रेस ट्रेन विदर्भातील नवीन अमरावती ते पंढरपूर रेल्वे स्थानकादरम्यान चालवली जाईल.

यामुळे विदर्भातील भाविकांना जलद गतीने विठुरायाचे दर्शन घेता येणे शक्य होणार आहे. दरम्यान आता आपण याच विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं असणार नवीन अमरावती पंढरपूर विशेष एक्सप्रेस ट्रेन चे वेळापत्रक
मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वे कडून नवी अमरावती ते पंढरपूर रेल्वे स्थानकादरम्यान विशेष गाड्याच्या चार फेऱ्या चालवल्या जाणार आहेत म्हणजेच नवी अमरावती ते पंढरपूर अशा दोन आणि पंढरपूर ते नवी अमरावती अशा दोन फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.
या विशेष गाडीच्या वेळापत्रकाबाबत बोलायचं झालं तर नवीन अमरावती पंढरपूर विशेष एक्सप्रेस ट्रेन म्हणजेच गाडी क्रमांक 01119 ही नवी अमरावती येथून 2 जुलै व 5 जुलै रोजी दुपारी 2.40 वाजता निघेल. सुमारे 18 तास 30 मिनिटांचा प्रवास करून ही विशेष रेल्वे दुसऱ्या दिवशी सकाळी 9.10 वाजता पंढरपूर येथे पोहोचेल.
परतीच्या प्रवासात पंढरपूर नवीन अमरावती विशेष एक्सप्रेस ट्रेन म्हणजेच गाडी क्रमांक 01120 ही 3 जुलै व 6 जुलै रोजी सायंकाळी 7.30 वाजता पंढरपूर येथून निघेल व दुसऱ्या दिवशी दुपारी 12.50 वाजता नवी अमरावती येथे पोहोचणार आहे. आता आपण ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार याचा आढावा घेऊयात.
कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार नवीन विशेष एक्सप्रेस ट्रेन
रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार नवी अमरावती पंढरपूर विशेष एक्सप्रेस ट्रेन या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. या विशेष रेल्वेगाडीला बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, शेगाव, जलंब,
नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पोचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड आणि कुर्डुवाडी या स्थानकांवर थांबा देण्यात आला असल्याची माहिती रेल्वे कडून देण्यात आली आहे.