जगात सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश कोणता?, भारत कितव्या नंबरवर? पाहा यादी

Published on -

जगभरात अनेक धर्म आहेत, पण इस्लाम हा त्यातील एक अत्यंत प्रभावशाली आणि वेगाने वाढणारा धर्म मानला जातो. आपल्या शेजारी देशापासून आफ्रिकेपर्यंत आणि युरोपच्या काही भागांपर्यंत या धर्माचे अनुयायी पसरलेले आहेत. ‘मुस्लिम बहुल देश’ म्हटले की लोकांच्या मनात अनेक शंका निर्माण होतात नेमके किती देश? कुठले देश? आणि कुठे सर्वाधिक मुस्लिम राहतात? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यूच्या आकडेवारीनुसार, सध्या जगात तब्बल 50 देश असे आहेत जिथे मुस्लिम लोकसंख्या बहुसंख्येत आहे. म्हणजेच या देशांमध्ये इस्लाम हा प्रमुख धर्म आहे आणि या धर्माचे नियम, परंपरा आणि जीवनशैली सामाजिक जीवनात खोलवर रुजलेली आहे. ही संख्या पाहूनच लक्षात येते की इस्लामचा प्रभाव किती व्यापक आहे आणि तो किती देशांमध्ये मुख्य प्रवाहाचा भाग आहे.

 

‘या’ देशात सर्वाधिक मुस्लिम

मोरोक्को हा देश मुस्लिम बहुलतेचा एक परिपूर्ण उदाहरण आहे. येथे जवळजवळ 100 टक्के लोक इस्लाम धर्माचे पालन करतात. एवढंच नव्हे, तर अफगाणिस्तान, सोमालिया, इराण आणि ट्युनिशियामध्येही मुस्लिम लोकसंख्येचा टक्का 99 पेक्षा अधिक आहे. या देशांमध्ये धार्मिक विधी, पोशाख, सामाजिक नियम, आणि न्यायव्यवस्थाही इस्लामिक परंपरेवर आधारित आहे.

शिया आणि सुन्नी

शिया आणि सुन्नी ही इस्लाममधील दोन प्रमुख पंथ आहेत. सध्या सुमारे 1.9 अब्ज लोक जगभरात मुस्लिम आहेत, यापैकी 1.5 अब्ज म्हणजेच सुमारे 150 कोटी सुन्नी पंथाचे आहेत. तर उर्वरित सुमारे 24 ते 34 कोटी शिया पंथाचे अनुयायी आहेत. विविध देशांमध्ये या दोघांची वाटणी वेगवेगळी आहे. काही देश सुन्नी बहुल आहेत, तर काही ठिकाणी शिया समुदाय अधिक प्रभावी आहे.

प्रत्येक देशाची लोकसंख्या वेगळी असल्यामुळे, मुस्लिमांची टक्केवारी आणि एकूण संख्या यात फरक असतो. इंडोनेशिया हा देश सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश मानला जातो. येथे मुस्लिमांची संख्या इतकी मोठी आहे की हा देश इस्लामी लोकसंख्येच्या दृष्टीने जगाच्या शिखरावर आहे. त्यानंतर पाकिस्तानचा क्रमांक लागतो, जिथे इस्लाम हा राष्ट्रधर्म आहे.

भारताचा नंबर कितवा?

विशेष म्हणजे भारत देखील या यादीत अत्यंत महत्त्वाचा देश आहे. जरी भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे आणि सर्व धर्मांना समान आदर आहे, तरीही येथे मुस्लिम समुदायाची संख्या सुमारे 20 कोटींपर्यंत पोहोचते, त्यामुळे भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश ठरतो. यानंतर बांगलादेशचा नंबर लागतो, जो स्वतंत्र इस्लामी देश असूनही भारताच्या मागे आहे.

अनेक अहवालांमध्ये सांगण्यात आले आहे की इस्लाम हा सध्या सर्वात वेगाने वाढणारा धर्म आहे. यामागे जन्मदर, विवाहसंस्कृती, तसेच धर्माची जीवनशैली लोकांना आकर्षित करणारी आहे हे कारण दिले जाते. विशेषतः आफ्रिका आणि आशियामध्ये या धर्माचा प्रसार लक्षणीय प्रमाणात वाढत आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!