अचानक कधीतरी शाळेच्या समोरून प्रवास झाला तर, अभ्यासात नेहमी टॉपर असणारी एखादी मुलं आपल्या सगळ्यांना आठवतात. ज्या मुलांचं नाव नेहमी यशाच्या यादीत असायचं, ज्यांच्या हातात कायम एखादं पुस्तक असायचं, आणि जे प्रत्येक प्रश्नाला नेमकं उत्तर देत असत. अशा मुलांबद्दल आपण हलक्याफुलक्या शब्दात “पुस्तकी किडे” असंही म्हणतो. पण या अभ्यासू स्वभावामागे फक्त कष्टच नाही, तर त्यांचा जन्मदिवस आणि त्यातून ठरलेला मूलांक देखील मोठी भूमिका बजावत असतो ,असं अंकशास्त्र सांगतं.

जर एखाद्या मुलाचा जन्म 3,12,21 किंवा 30 तारखेला झाला असेल, तर त्याचा मूलांक 3 ठरतो आणि हा मूलांक गुरु ग्रहाशी संबंधित असतो. गुरु, ज्याला ज्ञानाचा, बुद्धिमत्तेचा आणि नैतिकतेचा प्रतीक मानलं जातं, तो या मूलांकावर आपली छाया टाकतो आणि म्हणूनच या मूलांकातील मुलं लहान वयातच काही तरी वेगळं, हटके आणि प्रभावी करतात.
यशामागील गुपित
मूलांक 3 असलेल्या मुलांना शिकण्याची एक विलक्षण ओढ असते. त्यांचं मन अत्यंत तीव्र, उत्सुक आणि तपशील लक्षात ठेवणारं असतं. ते केवळ वाचत नाहीत, ते वाचून समजून घेतात, मनात साठवतात आणि योग्य वेळेला योग्य पद्धतीने ते ज्ञान वापरतात. म्हणूनच ही मुले अनेकदा इतर विद्यार्थ्यांपेक्षा अभ्यासात पुढे असतात. वर्गात नेहमी नाव घेतलं जाणारं, शिक्षकांचं आवडतं असं काहीसं त्यांचं व्यक्तिमत्व असतं.
त्यांच्या वाचनाची आवड हेच त्यांचं खरं सामर्थ्य आहे. त्यांना फक्त शालेय पुस्तकं नव्हे, तर विज्ञान, तत्त्वज्ञान, साहित्य, इतिहास यासारख्या विषयांचीही ओढ असते. त्यांची स्मरणशक्ती प्रखर असते आणि विचारशक्ती व्यापक. त्यामुळे त्यांना उत्तरे देताना भीती वाटत नाही उलट, त्यांचं उत्तर ऐकून अनेकदा शिक्षकही प्रभावित होतात.
स्वभाव आणि गुण
पण हे सगळं केवळ बुद्धिमत्तेवर नाही तर त्यांच्या संयम आणि धैर्यावरही आधारित असतं. या मूलांकाच्या मुलांमध्ये एक शांत, समजूतदार वृत्ती असते. परीक्षेचा ताण असो की घरचं एखादं संकट हे मुलं रडत नाहीत, गोंधळ करत नाहीत. ते शांत राहतात, विचार करतात आणि योग्य निर्णय घेण्यासाठी धैर्य राखतात. राग, द्वेष किंवा असहिष्णुता यांना ते दूर ठेवतात, कारण त्यांना माहीत असतं की अशा भावना त्यांच्या विचारशक्तीला बाधा आणू शकतात.
अनेकदा शाळेत अशी मुलं शांत, गप्पगुमान वाटतात, पण त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक असते. ही चमक असते जाणून घेण्याची, समजून घेण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची. म्हणूनच, मूलांक 3 असलेली मुलं नेहमीच टॉपर असतात.