जगभरात भारतीय रुपयाची किंमत जरी डॉलरच्या तुलनेत कमी असली, तरी जगाच्या अनेक भागांमध्ये रुपयाचं अस्तित्व आजही मोठ्या अभिमानाने टिकून आहे. आशिया, आफ्रिका, युरोप आणि दक्षिण अमेरिका अशा विविध खंडांमध्ये 26 देश असे आहेत जिथं भारतीय रुपया तिथल्या स्थानिक चलनाच्या तुलनेत अधिक मजबूत आहे. ही बाब ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल, पण हे सत्य आपल्या आर्थिक स्थैर्याचं प्रतिक आहे.

सध्या इराण-इस्रायल संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात अस्थिरता वाढली आहे, कच्च्या तेलाच्या किमती उंचावल्या आहेत आणि गुंतवणुकीचा ओघ थोडा मंदावला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत काहीसा घसरलेला असला, तरीही त्याचं वेगळं वैश्विक मूल्य अजूनही अबाधित आहे. काही दिवसांपूर्वीच रुपया डॉलरच्या तुलनेत 30 पैशांनी घसरून ₹86.47 या पातळीवर पोहोचला होता, पण याचा अर्थ असा नाही की रुपया कमकुवत आहे. त्याचा खरा प्रभाव वेगळ्या पद्धतीने समजून घ्यायला हवा.
रुपयाचे मूल्य
उदाहरणार्थ, लेबनॉनसारख्या देशात ₹1 म्हणजे1,036.07 लेबनीज पौंड इतकं अधिक मूल्य दाखवतो, तर इराणमध्ये ₹1 म्हणजे 487.46 रियाल आहे. हे आकडे बघितले की रुपयाच्या ताकदीचं भान येतं. व्हिएतनाम, लाओस, इंडोनेशिया यांसारख्या देशांमध्येही ₹1 चं मूल्य 180 ते 300 च्या दरम्यान आहे. याचा अर्थ असा की, तिथे भारतीय प्रवासी तुलनेत कमी खर्चात अधिक वस्तू खरेदी करू शकतात.
इतकंच नव्हे, तर दक्षिण अमेरिकेतील पॅराग्वे, कोलंबिया, अर्जेंटिना, चिली या देशांमध्येही रुपयाचं स्थान बळकट आहे. अफ्रिकेतील नायजेरिया, केनिया आणि युरोपमधील सर्बिया, हंगेरी आणि आइसलँडमध्ये देखील रुपयाचं मूल्य त्यांच्या स्थानिक चलनाच्या तुलनेत अधिक आहे.
आशियातील स्थिती
हे पाहता, भारताच्या आर्थिक स्थैर्यावर विश्वास वाढतो. कारण एकीकडे आंतरराष्ट्रीय अस्थिरता असताना देखील, भारताचं चलन अनेक देशांमध्ये विश्वासार्ह आणि उपयोगी आहे. ह्या देशांमध्ये भारतीय रुपयाची खरेदी क्षमता जास्त आहे, म्हणजेच पर्यटन, व्यवसाय किंवा गुंतवणुकीसाठी हे देश भारतीयांसाठी तुलनेने परवडणारे ठरतात.
आशियातील शेजारील देशांबाबत बोलायचं झालं, तर पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेश यांसारख्या देशांमध्येही रुपया त्यांच्यापेक्षा अधिक मजबूत आहे. उदाहरणार्थ, ₹1 ची किंमत ही 3.27 पाकिस्तानी रुपये, ₹1 ची किंमत 1.60 नेपाळी रुपये आणि ₹1 ची किंमत 1.14 टाका आहे. शेवटी, जरी डॉलरच्या तुलनेत काहीशी घसरण दिसत असली, तरी 26 देशांमध्ये भारतीय रुपया आजही स्थानिक चलनांपेक्षा अधिक मजबूत आहे.