भारतीय रेल्वे ही लाखो भारतीयांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. दररोज लाखो भारतीय ट्रेनने प्रवास करतात. मात्र, कधी-कधी अचानक प्रवास करायचा म्हटल्यावर अनेकांना ताणच येतो. काहीवेळा तर असेही घडते की प्रवास ठरलेला असतो, पण तिकीट मात्र वेटिंगलाच राहतं. अशा वेळी निराश होणं साहजिक आहे. पण, या समस्यावर आयआरसीटीसीकडेच एक अशी उपयुक्त सोय आहे, जी अजूनही अनेक प्रवाशांना माहिती नाही, ती म्हणजे चालू तिकीट बुकिंगची सुविधा.

चालू तिकीट बुकिंग म्हणजे?
चालू तिकीट म्हणजे नेमकं काय? आपण सहसा तत्काळ तिकिटांबाबत ऐकतो, ज्या प्रवासाच्या एक दिवस आधी सकाळी 10 वाजता (एसीसाठी) आणि 11 वाजता (स्लीपरसाठी) उपलब्ध होतात. पण जर तुम्हाला तत्काळमधूनही कन्फर्म तिकीट मिळालं नाही, तर यानंतरचा पर्याय असतो चालू तिकीट. हे तिकीट तुम्ही ट्रेन सुटण्याच्या अगदी काही वेळ आधीही मिळवू शकता, आणि काही वेळा तर ट्रेन सुरू झाल्यावरही उपलब्ध असू शकते. ही एक अशी सोय आहे जिच्यामुळे चार्ट तयार झाल्यावरही रिकाम्या राहिलेल्या सीट्सवर तिकीट मिळू शकते.
तिकीट कसं मिळवाल?
मग हे चालू तिकीट मिळवण्यासाठी करावं काय? यासाठी तुम्ही आयआरसीटीसी अॅप किंवा वेबसाइट वापरू शकता. ‘ट्रेन’ या विभागात ‘चार्ट व्हेकन्सी’ नावाचा पर्याय आहे, जिथे ट्रेन क्रमांक, तारीख आणि स्टेशन टाकून तुम्हाला कोणत्या डब्यात किती जागा रिकाम्या आहेत हे समजते. यानंतर, जर एखाद्या वर्गात सीट रिकामी असेल, तर ते ‘CURR_AVBL’ या कोडने दर्शवले जाते. म्हणजेच, ही जागा सध्या चालू तिकीट म्हणून उपलब्ध आहे.
हे तिकीट मिळवण्यासाठी टीटीईशी संपर्क करणंही एक मार्ग आहे. अनेक वेळा प्रवासादरम्यान टीटीईकडे रिकामी जागा असते आणि जर तुमचं वेटिंग तिकीट असेल किंवा तिकीटच नसेल, तर योग्य भाडं भरून टीटीईकडून मॅन्युअल तिकीट घेता येतं. यात विशेष बाब म्हणजे हे तिकीट तत्काळ तिकिटांपेक्षा किंचित स्वस्त असतं, कारण यात तातडीच्या शुल्काचा समावेश नसतो.
वेटिंग तिकिटांमधून उत्पन्न
रेल्वेच्या उत्पन्नाचा एक मोठा भाग वेटिंग तिकिटांमधूनही येतो. स्लीपर कोचमध्ये जवळपास 864 जागा असून देखील, बहुतांश वेळा 300 ते 400 पर्यंत वेटिंग लिस्ट असते. यातील काहीच तिकीट कन्फर्म होतात, उर्वरित प्रवासी वेटिंग तिकिटावरच प्रवास करतात, जे केवळ नियमबाह्य नाही तर अनेक वेळा असुरक्षितही ठरू शकते.
या पार्श्वभूमीवर चालू तिकीट बुकिंग ही सुविधा खूप उपयोगी आहे. ही सुविधा तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंतही तुमचा प्रवास सुरू ठेवण्याचा एक नवा मार्ग देते. विशेषतः अचानक लागणाऱ्या प्रवासासाठी, जिथे तत्काळ तिकीटही उपलब्ध नसते, तिथे चालू तिकिटांमुळे मोठा दिलासा मिळतो.