वय वाढत जाताना त्वचेला घट्टपणा आणि तेज राखून ठेवणारे कोलेजन या प्रथिनाचं शरीरातील प्रमाण हळूहळू कमी होऊ लागतं. त्यामुळे सुरकुत्या, त्वचा कोरडी पडणं, थकवा आणि त्वचेला तजेलदारपणा कमी होण्यासारख्या गोष्टी दिसू लागतात. अशा वेळी आपल्या आहारात अशा काही नैसर्गिक गोष्टींचा समावेश करणं उपयुक्त ठरतं, ज्या कोलेजनच्या उत्पादनात थेट किंवा अप्रत्यक्षपणे मदत करतात. त्यात एक सहज उपलब्ध होणारं आणि आपल्या स्वयंपाकघरात रोजचं असणारं फळ म्हणजे केळी.

केळी खाण्याचे फायदे
जरी केळी थेट कोलेजन वाढवत नसली तरी त्यात असलेले काही घटक, विशेषतः मॅंगनीज आणि थोड्याशा प्रमाणात व्हिटॅमिन सी, हे कोलेजन निर्मितीला हातभार लावतात. मॅंगनीज हा खनिज घटक शरीरात कोलेजन प्रथिनांच्या उत्पादनासाठी महत्त्वाचा असतो. त्याचबरोबर, व्हिटॅमिन सी देखील कोलेजन निर्मितीत सहाय्यक ठरतं, जे त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे.
केळीचे फायदे केवळ यावरच थांबत नाहीत. रोज सकाळी रिकाम्या पोटी एक केळं खाल्लं, तर पचनसंस्था मजबूत राहते आणि अन्नाचे पचन नीट होतं. याशिवाय, केळीत असलेला पोटॅशियम आणि फायबर्स हृदयासाठी हितकारक ठरतात. मूड सुधारण्यात, नैराश्याची लक्षणं कमी करण्यात आणि नैसर्गिक ऊर्जा मिळवण्यातही केळं मोठी भूमिका बजावतं. त्यामुळेच अनेक वेळा पोषणतज्ज्ञ दैनंदिन आहारात केळीचा समावेश करण्याचा सल्ला देतात.
केळी खाण्याचे चविष्ट पर्याय
केळी खाण्याचेही अनेक चविष्ट आणि सोपे पर्याय आहेत. तुम्ही ते सहज फळ म्हणून खाऊ शकता, दुधात घालून शेक तयार करू शकता किंवा सॅलड, पोहे, उपम्यासारख्या पदार्थात थोडं गोडपण देण्यासाठी वापरू शकता. काही जण तर ब्रेडवर पीनट बटरसोबत केळ्याच्या चकत्या ठेवूनही खातात, ही चव आणि आरोग्य दोन्ही जपणारी पद्धत ठरते.
तुमच्या त्वचेतील कोलेजन वाढवण्यासाठी केळीबरोबरच आहारात संत्री, लिंबू, आवळा, ब्रोकलीसारखी लिंबूवर्गीय फळं, तसेच हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करणं उपयुक्त ठरेल. भरपूर पाणी प्यायल्यानेही त्वचेचं आरोग्य टिकवता येतं.