आजकाल बहुमजली इमारतींच्या जगात लिफ्ट हा आपल्या रोजच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. ऑफिस, मॉल, अपार्टमेंट किंवा हॉस्पिटल कुठेही गेलं तरी लिफ्ट वापरणं अपरिहार्य आहे. पण या आधुनिक सुविधेमध्येही कधी अचानक अडथळा येतो, अशावेळी बरेच जण प्रचंड घाबरून जातात.

कल्पना करा, तुम्ही ऑफिसला जायला निघालात, घाईगडबडीत लिफ्टमध्ये चढलात, आणि अचानक लिफ्ट मध्येच थांबते! बाहेर कुणी नाही, आत मोबाइल नेटवर्कही कदाचित क्षीण. अशा परिस्थितीत अनेकांचा थरकाप उडतो, काही जण घाबरून ओरडतात, तर काही जण जबरदस्तीने दरवाजे उघडण्याचा प्रयत्न करता आणि नेमकी हीच एक चूक आपल्या सुरक्षिततेसाठी मोठा धोका ठरते.
अलार्म बटण दाबा
अशा प्रसंगात सर्वात महत्त्वाचं म्हणजे शांत राहणं. घाबरून काहीही उपयोग नाही, उलट चुकीचं पाऊल तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. पहिल्यांदा, लिफ्टमध्ये असलेलं अलार्म बटण दाबा. ही एक मूलभूत सुरक्षा सुविधा असते जी थेट सुरक्षा कक्षाशी जोडलेली असते. त्यानंतर, जर तुमच्याकडे मोबाइल नेटवर्क असेल, तर आपत्कालीन सेवा किंवा बिल्डिंगच्या सुरक्षा विभागाशी संपर्क साधा.
दरवाजे जबरदस्तीने उघडू नका
जर लिफ्टच्या जवळ एखादा व्यक्ती असेल तर मोठ्याने आवाज करून आपली अडचण कळवा. बहुतेक वेळेस असे प्रसंग हॉटेल्स किंवा अपार्टमेंटमध्ये होतात जिथे सुरक्षा कर्मचारी त्वरित मदतीला येऊ शकतात. परंतु, दरवाजे जबरदस्तीने उघडण्याचा प्रयत्न अजिबात करू नका, कारण यामुळे लिफ्टच्या इलेक्ट्रॉनिक यंत्रणेवर ताण येतो आणि एखादा यांत्रिक दोष जीवघेणा ठरू शकतो.
हळूहळू श्वास घ्या
लिफ्टमध्ये अडकलेले असताना हवा बंद होण्याची किंवा ऑक्सिजन संपण्याची भीती बऱ्याच लोकांना वाटते. पण बहुतांश लिफ्ट्समध्ये हवाद्वारे श्वास घेण्याची सोय असते, त्यामुळे श्वास कमी होतोय असं वाटलं तरी फक्त खोलवर, हळूहळू श्वास घ्या. शक्य असल्यास, खाली बसून स्वतःला शांत ठेवा. तुम्ही पाण्याची बाटली बरोबर घेतली असेल, तर थोडं पाणी प्यायला विसरू नका. हा वेळ स्वतःला धीर देण्याचा असतो, पॅनिक होण्याचा नाही.
आवाज देऊन प्रतिसाद द्या
कधी कधी बचाव पथकाला पोहोचायला काही वेळ लागू शकतो, विशेषतः मोठ्या इमारतींमध्ये. अशा वेळी अलार्म बटण अधूनमधून दाबत राहा, जेणेकरून तुमची उपस्थिती सतत लक्षात येईल. जर वरून काही आवाज येत असेल, तर मोठ्याने प्रतिसाद द्या “मी इथे अडकलोय”, “लिफ्टमधून आवाज येतोय” असे स्पष्ट सांगा.
या प्रसंगातून शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे, लिफ्टचा वापर करताना हलगर्जीपणा करू नका. क्षमतेपेक्षा जास्त लोकांनी चढू नका, दरवाजे बंद होत असताना उघडण्याचा प्रयत्न करू नका आणि लिफ्टमध्ये असतानाही यंत्रणेकडे लक्ष ठेवा.
लिफ्टमध्ये अडकणं एक असामान्य आणि घाबरवणारा अनुभव असू शकतो, पण योग्य माहिती, संयम आणि सतर्कता यामुळे तुम्ही तो सुरक्षितपणे हाताळू शकता.