भारतीय रेल्वेकडून RAC प्रवाशांना मोठं गिफ्ट, प्रवासात मिळणार ‘या’ खास सुविधा!

भारतीय रेल्वेचा प्रवास म्हणजे अनेकांसाठी जीवनाचा भागच आहे. मग तो ऑफिसला जाण्यासाठी असो, सहलीसाठी असो किंवा घरच्या मंडळींना भेटायला. मात्र, आरएसी म्हणजेच “Reservation Against Cancellation” असलेल्या प्रवाशांना नेहमीच असुविधा मिळायच्या. तिकीट पूर्ण कन्फर्म नसल्यामुळे साइड‑लोअर बर्थ शेअर करावी लागायची, आणि त्याहूनही त्रासदायक म्हणजे बेडरोल म्हणजे उशी, चादर, ब्लँकेट यासाठीही एकच संच मिळायचा, तोही शेअर करत. पण आता या सगळ्याला पूर्णविराम देत, भारतीय रेल्वेने एक मोठा बदल केला आहे.

RAC प्रवाशांना मिळणार ‘ही’ सुविधा

आरएसी तिकीट असलेल्या प्रवाशांना आता एसी कोचमध्ये प्रवास करताना कन्फर्म तिकीटधारकांप्रमाणेच संपूर्ण बेडरोल किट मिळणार आहे. यात दोन चादरी, एक ब्लँकेट, एक उशी आणि एक टॉवेल यांचा समावेश असेल. म्हणजेच, आता प्रवास अधिक आरामदायी, स्वच्छ आणि आरोग्यदायी होणार आहे.

पूर्वी अनेकदा अशी तक्रार असायची की एका सीटवर दोन आरएसी प्रवासी बसतात, झोपतात आणि त्यांना एकच बेडरोल सेट दिला जातो. त्यामुळे गैरसोय तर होतच, पण काही वेळा प्रवाशांमध्ये वादही होत. आता वैयक्तिक बेडरोल दिल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. प्रत्येक प्रवाशाला स्वतंत्र पॅकेज्ड सेट दिला जाणार असल्यामुळे स्वच्छता आणि वैयक्तिक सुरक्षिततेचा स्तरही वाढणार आहे.

 

रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला तेव्हा फक्त सुविधा वाढवणं नव्हे, तर प्रवाशांच्या मानसिक समाधानावर भर देणं हाच उद्देश होता. आरएसी तिकीट असले तरी प्रवाशांनी तिकीटासाठी संपूर्ण पैसे भरलेले असतात, मग सुविधा का नाही मिळू? याच न्याय्य प्रश्नाचं उत्तर आता रेल्वेने सकारात्मक कृतीतून दिलं आहे.

 

या योजनेची अंमलबजावणी डिसेंबर 2023 मध्ये सुरू झाली. रेल्वे बोर्डाने सर्व झोनल जनरल मॅनेजरना निर्देश दिले की, RAC प्रवाशांना त्यांच्या सीटवर पोहोचताच वैयक्तिक बेडरोल किट द्यावे. कोच अटेंडंट आता प्रत्येक प्रवाशाला वेळेवर किट देतो, ज्यामुळे प्रवासात विलंब किंवा त्रास होत नाही.

‘इथे’ करता येईल तक्रार

स्वच्छतेच्या दृष्टीनेही ही सुधारणा खूप महत्त्वाची आहे. बेडशीट्स आणि ब्लँकेट्स नियमितपणे यांत्रिक लाँड्रीमध्ये धुतले जातात. विशेष म्हणजे, ब्लँकेट्स धुण्याचा कालावधी 30 दिवसांवरून आता 15 दिवसांवर आणला आहे, ज्यामुळे आरोग्यदृष्टीनेही हा बदल फायदेशीर ठरत आहे. बेडरोलमध्ये वापरण्यात येणाऱ्या वस्तू BIS (भारतीय मानक संस्था) प्रमाणित आहेत, म्हणजे दर्जाविषयी शंका नाही.

जर प्रवासादरम्यान तुम्हाला बेडरोल न मिळाल्यास किंवा ते खराब स्थितीत आढळले, तर तुम्ही त्वरित कोच अटेंडंट, टीटीई किंवा RailMadad/IRCTC अ‍ॅपद्वारे तक्रार करू शकता आणि प्रवास संपल्यानंतर बेडरोल सीटवरच ठेवण्याची सूचना दिली आहे, जेणेकरून ते पुन्हा वेळेवर धुतले जाऊ शकतील आणि चोरी टाळता येईल.