पावसाळ्यातील स्कीन प्रॉब्लेम्सपासून मिळवा सुटका, ‘या’ घरगुती उपायाने त्वचेला मिळेल नैसर्गिक चमक!

Published on -

पावसाळा सुरू झाला की, त्वचेशी संबंधित समस्या प्रचंड वाढतात. चेहऱ्यावर मुरुमं, ओलसरपणामुळे फंगल इंफेक्शन, डाग-धब्बे आणि कोरडेपणा अशा अनेक तक्रारी वाढतात. त्यामुळे सुंदर, निरोगी त्वचा टिकवायची असेल, तर थोडी जपणूक आणि थोडा घरगुती उपाय लागतो. आणि या सगळ्यांत सहज मिळणारं, स्वस्त आणि अचूक काम करणारा घटक म्हणजे आपल्या स्वयंपाकघरातलंच मध.

आरोग्यासाठीची मध ठरते वरदान

आपल्याला लहानपणापासूनच मधाचे फायदे ऐकायला मिळाले आहेत. कोरडा खोकला असो किंवा गळा खराब झाला असेल मधाची एक चमचा मात्रा उपयोगीच पडते. पण मध हे केवळ आरोग्यासाठी नाही तर त्वचेसाठीही एकदम वरदान आहे. विशेषतः पावसाळ्यासारख्या दमट हवामानात, जेव्हा त्वचेला नैसर्गिक शुद्धीकरण आणि पोषण हवे असते, तेव्हा मध एखाद्या जादूच्या घटकासारखे काम करते.

या ऋतूत त्वचेची झीज अधिक होते. धुळीमुळे चेहऱ्यावर तेल साठते, ओलसर हवेमुळे त्वचेचे छिद्र बंद होतात आणि त्यातून मुरुमं, फोड, पुरळ निर्माण होतात. अशा वेळी मधाचा वापर त्वचेला केवळ मऊ आणि स्वच्छ ठेवत नाही, तर ती आतूनही ताजीतवानी ठेवतो. त्यामध्ये असणारे अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचेवरच्या जंतूंना नष्ट करतात. पावसामुळे होणाऱ्या लहानसहान जखमा असो, स्किन इंफेक्शन असो मध थेट लावल्यास बरे होण्याची प्रक्रिया जलद होते.

मधाचे फायदे आणि वापर

विशेष म्हणजे, मधाचे फायदे यावरच थांबत नाहीत. काही वेळा आपण ज्या महागड्या फेशियल क्रीम्स किंवा मास्क वापरतो, त्यामध्येही मधचाच एक महत्त्वाचा घटक असतो. कारण मध त्वचेला नैसर्गिक ओलावा देतो, सुरकुत्या दूर ठेवतो आणि चेहऱ्याचा रंग उजळवतो. जर पावसाळ्यात दररोजच्या त्वचेच्या काळजीत मधाचा समावेश केला, तर फेशियल करण्याची गरजही भासत नाही.

सामान्यतः लोक मध केवळ खाण्यासाठी वापरतात, पण जर तुम्ही दर आठवड्यातून दोनदा तरी मधाचा फेसपॅक लावलात जसे की मधात थोडीशी हळद आणि लिंबाचा रस मिसळून चेहऱ्यावर लावले तर तुम्हाला काही दिवसांतच त्याचा फरक जाणवेल. त्वचा मऊ, उजळ आणि फ्रेश वाटू लागते. इतकंच नाही, तर डोळ्यांखालील काळसरपणा, डागही हळूहळू कमी होतात.

मधाचा आणखी एक अद्भुत उपयोग म्हणजे केसांसाठी. हलक्या नारळ तेलात मध मिसळून लावल्यास केसांची मुळे मजबूत होतात, केस गळती कमी होते आणि नैसर्गिक चमक परत येते. पावसाळ्यात केस गळती ही एक सामान्य तक्रार असते, त्यावरही हा उपाय गुणकारी ठरतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!