जग सध्या अनेक अशांत घटनांनी व्यापलेलं असताना, एक नवीन भविष्यवाणी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे आणि तीही कोणत्याही सामान्य व्यक्तीकडून नव्हे, तर जपानमध्ये “न्यू बाबा वेंगा” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रियो तात्सुकी या व्यक्तीकडून. त्यांनी जुलै 2025 मध्ये जपानमध्ये येणाऱ्या एका भीषण नैसर्गिक आपत्तीची कल्पना मांडली आहे. ही चेतावणी केवळ स्थानिक नाही, तर संपूर्ण आशिया खंडाला हादरवणारी आहे.

जगप्रसिद्ध भविष्यातील घटनांचे अंदाज बांधणारे बाबा वेंगा यांच्याप्रमाणेच, रियो तात्सुकी यांनीही अनेक गोष्टी पूर्वी सांगितल्या आणि त्या काही अंशी खऱ्याही ठरल्या. त्यांनी 2011 चा तोहोकू भूकंप, COVID-19 चा उद्रेक आणि राजकुमारी डायनाच्या मृत्यूचा अंदाज वर्तवला होता. त्यामुळे त्यांनी 5 जुलै 2025 रोजी येणाऱ्या एका भयानक आपत्तीचा इशारा दिल्यावर, सामान्य जनतेसह वैज्ञानिक मंडळीतही चिंता पसरली आहे.
जपानबाबत धक्कादायक भाकीत
रियो यांच्या ‘द फ्युचर आय सॉ’ या पुस्तकात म्हटलं आहे की जपानच्या दक्षिण भागात, विशेषतः कागोशिमा आणि कुमामोटो परिसरात, समुद्रात खोल भेगा पडू शकतात. त्यामुळे ज्वालामुखीचा उद्रेक होऊन भूकंप निर्माण होईल आणि त्याच्यामुळे महाकाय त्सुनामी निर्माण होईल. या शब्दांनी लोकांच्या मनात भीतीचं सावट पसरवलं आहे.
याच भविष्यवाणीमुळे हाँगकाँग ते जपानदरम्यानच्या फ्लाइट बुकिंगमध्ये तब्बल 83% घट झाली आहे. विशेषतः जुलै आणि ऑगस्टसाठी, जे सहलींसाठी सर्वोत्तम महिने मानले जातात, अनेक प्रवास रद्द झाले आहेत. कागोशिमा आणि कुमामोटो शहरांमधील विमान उड्डाणे कमी झाली असून, बोईंग फ्लाइट्समध्ये 15-20% पर्यंत रद्दीकरणे झाल्याचं ब्लूमबर्गच्या अहवालात नमूद केलं आहे.
तात्सुकी यांचा दावा केवळ त्सुनामीपर्यंत मर्यादित नाही. ते म्हणतात की ही आपत्ती मानवी निर्मितही असू शकते. म्हणजेच, आण्विक चूक, प्रायोगिक दुर्घटना किंवा समुद्रात एखादा महाकाय स्फोट. ही अस्वस्थता अधिक वाढवणारी बाब म्हणजे याआधी त्यांच्या बऱ्याच भाकितांमध्ये अचूकता दिसून आली आहे.
जपानी सरकार झालं अलर्ट
या साऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जपान सरकारही सतर्क झालं आहे. मियागी प्रांताचे गव्हर्नर योशिहिरो मुराई यांनी नागरिकांना आणि पर्यटकांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी हेही स्पष्ट केलं आहे की, कोणत्याही भूकंपाचा किंवा त्सुनामीचा अचूक अंदाज शक्य नाही. मात्र, अफवांमुळे जपानच्या पर्यटनावर आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो आहे, हेही त्यांनी मान्य केलं आहे. हाँगकाँग, चीन आणि थायलंडमधून जपानसाठी होणाऱ्या बुकिंगमध्ये 50% ते 83% पर्यंत घसरण झाली आहे, ज्याचा थेट आर्थिक परिणाम होणार आहे.