महाराष्ट्रात अकरावीच्या प्रवेश (Maharashtra 11th Admission) प्रक्रियेचा एक महत्त्वाचा टप्पा आज गाठला जातोय. विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल का, याची उत्सुकता आणि थोडीशी धाकधुक दोन्ही मनात आहे. आज संध्याकाळी पाच वाजता राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाइटवरून पहिल्या फेरीची प्रवेश यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थी आणि पालक मोबाईल आणि संगणकासमोर डोळे लावून बसले आहेत.
यंदा खास बाब म्हणजे, पहिल्यांदाच संपूर्ण राज्यात एकत्रित ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. याआधी प्रत्येक विभागानुसार वेगवेगळ्या पद्धतीने प्रवेश होत असे, पण आता ही प्रक्रिया पूर्णपणे केंद्रीकृत झाली आहे. म्हणजे मुंबईपासून नागपूरपर्यंत, नाशिकपासून कोल्हापूरपर्यंत सगळे विद्यार्थी एकाच पोर्टलवरून अर्ज करू शकतात आणि प्रवेश यादीही एकाच ठिकाणी पाहू शकतात. यामुळे पारदर्शकता वाढली असली तरी, नव्या प्रणालीमुळे थोडा गोंधळ आणि तणावही निर्माण झाला आहे.

आज जाहीर होणाऱ्या पहिल्या यादीत विद्यार्थ्यांनी भरलेल्या पसंतीक्रमानुसार जागा मिळालेली आहे का, हे पाहणे फार महत्त्वाचे ठरेल. जर कोणाला पहिली पसंती मिळाली, तर त्याने संबंधित कॉलेजमध्ये जाऊन वेळेत प्रवेश पूर्ण करणे गरजेचे आहे. पण जर जागा मनासारखी नसेल, तर पुढील फेरीची वाट पाहण्याचा पर्यायही विद्यार्थ्यांना खुला आहे. काही विद्यार्थ्यांना यादीत जागाच मिळालेली नसेल, तर त्यांनाही काळजी करण्याची गरज नाही पुढील फेऱ्यांमध्ये संधी नक्की मिळू शकते.
राज्यात एकूण सुमारे वीस लाख जागा उपलब्ध आहेत. यामध्ये विज्ञान शाखेत सर्वाधिक, सुमारे आठ लाखांहून अधिक जागा आहेत. वाणिज्य शाखेत पाच लाखांहून अधिक तर कला शाखेत साडेसहा लाखाच्या आसपास जागा आहेत. ही माहिती लक्षात घेता, विद्यार्थ्यांना आपापल्या गुणांनुसार व पर्यायांनुसार चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आहे.
तांत्रिकदृष्ट्या पोर्टल अधिक सुलभ व्हावं यासाठी सरकारने काही बदल केले आहेत. मोबाईलवर सहज वापरता येईल असं पोर्टल बनवण्यासाठी काही वेळ वेबसाइट बंद ठेवण्यात आली होती. आता ती पुन्हा सुरू झाली असून विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रिया अधिक सोपी वाटत आहे. या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण आली, तर त्यांना मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक आणि ईमेल आयडीही देण्यात आले आहेत
पहिली यादी कशी पाहाल?
mahafyjcadmissions.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
तुम्ही अर्ज भरलेला तुमचा विभाग निवडा
“Round One Seat Allotment List (2025-26)” या लिंकवर क्लिक करा
तुमचा नाव किंवा रोल नंबर शोधा
यादी डाउनलोड करा आणि प्रिंट काढून ठेवा
तुमचं नाव यादीत नसेल तर काय कराल?
जर तुम्हाला पहिली पसंती मिळाली असेल, तर संबंधित कॉलेजमध्ये जाऊन दिलेल्या वेळेत प्रवेश पूर्ण करा
जर पसंतीनुसार जागा मिळाली नसेल आणि दुसऱ्या पर्यायांची वाट पाहत असाल, तर पुढील फेरीसाठी प्रतीक्षा करा