एक-एक थेंब लाखमोलाचा!’इथे’ मिळतं जगातील सर्वात महागडं मध, 1 किलो मधाची किंमत तब्बल 9 लाख रुपये

जगात मधाच्या असंख्य प्रकारांमध्ये एक असा प्रकार आहे, जो केवळ त्याच्या चवेसाठी नव्हे, तर त्याच्या किंमतीमुळेही चर्चेत असतो. एखाद्या चॉकलेटचा थेंब जिभेवर ठेवल्यावर जसा विरघळतो, तसाच हा मध शरीरात एक विलक्षण अनुभव निर्माण करतो इतका की त्याला ‘स्वर्गासारखा’ म्हटलं जातं. पण हा मध गोड नसून किंचितसा कडवट असतो आणि तरीही तो जगातील सर्वात महागडा मानला जातो.

एल्विश मध

तुर्कीमधील एल्विश हा मध फक्त चव किंवा रंगामुळे प्रसिद्ध नाही, तर त्यामागील मेहनत, धोकादायक प्रक्रिया आणि आरोग्यावर होणारे फायदे यामुळे त्याला ‘गोल्डन हनी’ असंही म्हटलं जातं. तुर्कीच्या आर्टविन प्रांतातील उंच आणि खोल गुहांमध्ये 1,800 मीटरवर मधमाश्या आपले घरटे बांधतात. हे घरटे सामान्य झाडांवर नसते, तर खडकांच्या दरडांमध्ये असते. या ठिकाणी पोहोचण्यासाठी स्थानिक लोकांना जीव धोक्यात घालावा लागतो. ही मोहिम दरवर्षी फक्त एकदाच राबवली जाते. त्यामुळेच हा मध दुर्मिळ ठरतो.

एक किलो एल्विश मधाची किंमत तब्बल 9 लाख रुपये आहे. ही रक्कम ऐकून कोणीही चकित होईल. पण या मधामध्ये अँटीऑक्सिडंट्स, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतात. त्याचा वापर प्राचीन काळापासून अनेक औषधांमध्ये केला जातो. विशेषतः पाचन, श्वसन आणि त्वचारोगांवर तो प्रभावी मानला जातो.

एल्विश मध इतकं खास का?

या मधाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो जंगलात उगवणाऱ्या औषधी वनस्पतींच्या रसावर तयार होतो. मधमाश्या ज्या झाडांवरून रस गोळा करतात, ती झाडं साधी नाहीत, तर औषधी आहेत त्यामुळेच या मधाला सामान्य मधापेक्षा वेगळी चव, गंध आणि गुणधर्म प्राप्त होतात.

 

एल्विश मधाची शुद्धता आणि औषधी ताकद इतकी खास आहे की तुर्की सरकारच्या फूड इन्स्टिट्यूटमार्फत त्याची काटेकोर चाचणी घेतली जाते. ग्राहकांपर्यंत केवळ उच्च प्रतीचा आणि 100% नैसर्गिक मध पोहोचवला जातो.

जगात एल्विश मधासोबतच इस्रायलचा ‘लाईफ मेल हनी’ देखील प्रसिद्ध आहे, ज्याची किंमत जवळपास 50,000 रुपये प्रति किलो असते. पण एल्विश मध, त्याच्या दुर्मिळतेमुळे आणि धोकादायक काढणी प्रक्रियेमुळे सर्वोच्च स्थानावर आहे.